मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील विविध भागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी, भाविक, यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने काही अटी-शर्तींच्या अधीन राहून एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पण कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा देण्यात येणार नाही, अशी माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.
या प्रवासासाठी नागरिकांनी जेथे पोलिस आयुक्तालय आहे, तेथील संबंधित नोडल ऑफिसरचे (त्या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त-DCP) अनुमती पत्र व इतर ठिकाणी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्या अनुमतीचे पत्र घेणे आवश्यक आहे. तसेच अशा अनुमती प्राप्त नागरिकांचे २२ जणांचे गट करून संबंधित नोडल ऑफिसरमार्फत प्रवास करणाऱ्यांची यादी एसटीच्या जिल्हा स्तरावरील विभाग नियंत्रकाकडे दिली जाईल. त्यानुसार सदर नागरिकांना महामंडळामार्फत एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील आणि नोडल ऑफिसरमार्फत अनुमती प्राप्त नागरिकांना एसटी बसेसने त्यांच्या जिल्हा/तालुक्याच्या ठिकाणी सुखरूप पोहचविले जाईल.
ज्या नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर प्रवास करावयाचा आहे त्यांनी नोडल ऑफिसरकडून ऑनलाईन अर्ज करून अनुमतीपत्र प्राप्त करून घ्यावे. सदर पत्र प्राप्त झालेल्यांसाठी सोमवारपासून एसटीचे नवीन पोर्टल सुरू होत आहे. त्यांनी तेथे आपल्या प्रवासाची नोंद करावी. त्यांच्या प्रवास ठिकाणानुसार त्यांचे २२-२२ चे गट करून त्यांना एसटी बसेसची व्यवस्था करून देण्यात येईल.
या प्रवासासाठी दिलेल्या बसेस सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील. संपूर्ण प्रवासात सोशल डिस्टसिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे गाडी मध्यंतरी कुठेही थांबणार नसल्यामुळे प्रवाशांनी स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागणार आहे. असेही श्री. परब यांनी संगितले. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात बसेस सज्ज ठेवाव्यात असे आदेश देऊन, प्रवास करणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि महामंडळाला सहकार्य करावे, असेही आवाहन श्री. परब यांनी केले आहे.
Share your comments