शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविण्यावर भर

22 January 2019 08:24 AM


कोल्हापूर:
 शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रातील नवनवे प्रयोग आणण्याबरोबरच शेतकऱ्यांना सहाय्यभूत होणाऱ्या नवनव्या योजना प्राधान्यक्रमाने राबविण्यावर शासनाचा सर्वाधिक भर राहिल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना दिली. शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या जिल्हा कृषि महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास आमदार डॉ. सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, नगराध्यक्षा अलका स्वामी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविण्यावर शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकरी सुखी, समृध्द करण्यावर शासनाचा भर असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून यांना सुविधा उपलब्ध करुन देऊन निर्यातीवर भर देण्याचा शासनाचा मानस आहे. गेल्या चार वर्षात शासनाने शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकविध क्रांतीकारी निर्णय घेतले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या परंपरागत शेती क्षेत्रात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची भर घालून उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, माती परिक्षण, हमीभाव अशा विविध योजनांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाची नवी योजना शासनाने तयार केली असून ही योजना केंद्राकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कमी पाण्यात, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळावे यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असून अशा कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन नव तंत्रज्ञान शेती क्षेत्रात आणले जाईल, असे ते म्हणाले. 

शासनाने जमिनीच्या आरोग्य पत्रिका तयार करुन त्यानुसार उत्पादन घेण्यावर भर दिला असून गावा-गावात माती परिक्षण फिरत्या प्रयोगशाळेद्वारे करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशातील 70 ते 80 लाख शेतकऱ्यांच्या जमिनीचे माती परिक्षण केले आहे. राज्यात जलयुक्त शिवार अभियान गतिमान करुन 16 हजार गावातील कामे पूर्ण केली आहेत त्यामुळे भूर्गभातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. यापुढेही जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा थेंब न थेंब जलयुक्त शिवार अभियानाद्वारे अडवून जमिनीत मुरविण्यावर भर दिला जाईल. 

एफ.आर.पी नुसार ऊस उत्पादकांना दर देणे बंधनकारक असून गेल्या चार वर्षात एफ.आर.पी नुसार शेतकऱ्यांना भाव दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर निर्यातीवर भर देऊन साखरेचे भाव संतुलीत ठेवण्याचा प्रयत्न आहे. तसेच पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉलचा वापर अधिकाअधिक करण्यावर शासनाचा भर असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. जिल्हा कृषी महोत्सवातून कृषी क्षेत्रातील प्रगत कृषि तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांना पर्यंत पोहचेल तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतक-यांच्या यशोगाथा शेतकऱ्यांना पहावयास मिळतील असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या कृषी महोत्सवाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकाअधिक लाभ घ्यावा आणि प्रगत कृषी तंत्रज्ञान अवगत करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

या प्रसंगी बोलताना आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, शेती क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा या कृषी महोत्सवातून एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या महोत्सवाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, शासनाने गट शेतीला प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. या बरोबरच शेती विकासाच्या नवनव्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावेत. यावरही शासनाने भर दिला आहे. शासनाने शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्रीची व्यवस्था उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांचे हित जोपासले असल्याचे ते म्हणाले. 

प्रारंभी कृषी सह संचालक दशरथ ताभांळे, यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात सांगितले, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेती क्षेत्रावर शासनाने अधिक भर दिला आहे. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिंबक सिंचन, मागेल त्याला फळ बाग अशा योजनांवर भर दिला आहे. गेल्यावर्षी राज्यात ठिंबक सिंचनासाठी 600 कोटी खर्च तर कृषि यांत्रिकीकरणावर 400 कोटीचा खर्च करण्यात आला आहे. शेवटी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी आभार मानले.

कृषी महोत्सवामध्ये विषमुक्त सेंद्रिय शेती या संकल्पनेवर भर दिला असून ऊस पिकामध्ये स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा, क्षारपड जमिन सुधारणेसाठी सब सरफेस ड्रेनेज, बांबूपासून बनविलेली तलम कपडे याबाबतचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले आहेत. गट शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना समूह शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. धान्य महोत्सवामध्ये उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यामधून दर्जेदार तूरडाळ, मूगडाळ व उडीदडाळ, बार्शी (सोलापूर) येथून उत्कृष्ठ ज्वारी (बार्शीशाळू) शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांच्या माध्यमातून ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

याप्रसंगी कृषी विभागाने काढलेल्या यशोगाथा या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शेतकरी लाभार्थी, प्रगतशील शेतकरी आणि प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, अधिकारी यांचा सत्कारही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. समारंभास अतिरीक्त पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, प्रातांधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार सुधाकर भोसले, गजानन गुरव, मुख्यधिकारी दिपक पाटील, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक भाग्यश्री फरांदे, यांच्यासह अनेक मान्यवर, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

chandrakant patil चंद्रकांत पाटील organic chemical free विषमुक्त सेंद्रिय मागेल त्याला शेततळे magel tyala shettale जलयुक्त शिवार jalyukta shivar
English Summary: Focus on implementing new schemes for farmers

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.