सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात दिमाखात उभे आहेत. जर आपण विचार केला तर कुठलेही क्षेत्र असे नाही की त्यामध्ये महिला या अग्रस्थानी नाहीत आणि खरंच ही एक अभिमानास्पद बाब आहे
जर आपण आपल्या कृषी क्षेत्राचा विचार केला तर कृषी क्षेत्रामध्ये तर महिलांचा सहभाग पहिल्यापासून आहेच. परंतु आता कृषी क्षेत्रातील ज्या काही उपयोगी योजना आहेत त्यामध्ये खास महिलांसाठी 50 टक्के राखीव अशा योजना ठेवले जाणार आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रातील येणारा काळ हा महिलांचा असेल यात शंकाच नाही.
एवढेच नाही तर आता लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून घरातील महिलेचे नाव सातबारा उताऱ्यावर अगदी कुठलेही शुल्क न घेता लावले जाणार आहे. तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनासाठी,शेतकऱ्यांच्या शेतीमालास विक्रीसाठी सरकारी जागा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील कृषी महाविद्यालय इमारत उद्घाटन आणि महिला शेतकरी मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे बोलत होते.
या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. अशोक ढवण, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आमदार डॉ. राहुल पाटील इत्यादी बरेच मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना दादा भुसे म्हणाले की, महिलांचा सन्मान हा प्रत्यक्ष कार्यातून व्हायला हवा व अशा पद्धतीच्या आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आहेत. याच अनुषंगाने या कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. सद्यस्थितीत कृषी शिक्षणाची सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध झाली आहे व त्याचाच परिणाम म्हणून कृषी शिक्षणातील मुलींचे प्रमाण देखील हे 55 टक्क्यांपर्यंत वाढलेली आहे.
अगोदर कृषी विभागाच्या 30 टक्के योजना महिलांसाठी राखीव होत्या परंतु आता येणारा काळा 50% राखीव योजनांसाठी राहील.
यावेळी पुढे बोलताना कृषिमंत्री भुसे यांनी आवाहन केले की, शेतकरी आत्महत्या हा एक चिंतेचा विषय असून कुठलीही समस्यांमधून मार्ग निघत असतो त्यामुळे कुठल्याही प्रकारची टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेऊ नये. याप्रसंगी कृषिमंत्री भुसे यांनी गोळेगाव परिसरातील हळद काढणे करणाऱ्या महिलांच्या तसेच परभणी येथील वसमत रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Share your comments