आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ अर्थातच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आज शेतकऱ्यांनी बंद पाडली. कांद्याचे दर लक्षणीय कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांद्याला मागणी नसल्यामुळे शेतकरी बांधवांना कांदा विक्री करताना अक्षरशा नाकीनऊ येत आहेत मात्र असे असतानाच शेतकरी बांधवांनी लासलगाव एपीएमसी बंद पाडली.
कारण की लासलगाव एपीएमसीमध्ये कांदा विक्री साठी आलेल्या एका शेतकऱ्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून काही अज्ञात भामट्यांनी एका शेतकऱ्याचे ट्रॅक्टर चोरीला नेले. विशेष म्हणजे या भामट्यांनी ट्रॉली व ट्रॉलीतले कांदे तसेच ठेवले मात्र, ट्रॅक्टरचा गायब केले. सदर घटना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली असल्याने या चोरीची सर्वस्वी जबाबदारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडे आहे.
असे असताना बाजार समिती आवारात लावलेले सीसीटीव्ही निकामी असल्याने चोराचा सुगावा घेणेदेखील कठीण झाल्याचे बघायला मिळाले. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या ढीसाळ प्रशासनामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच बंद पाडली. मंगळवारी सकाळी सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचे काही काळ व्यवहार थांबवले.
बाजार समिती प्रशासनाने मदतीचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी व्यवहार सुरळीत करण्यास परवानगी दिली. एकंदरीत या घटनेमुळे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून तमगा मिरवत असलेल्या लासलगाव एपीएमसीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
हेही वाचा:-Onion Rate: उन्हाळी कांदा बाजारात दाखल, मात्र मिळतोय कवडीमोल दर; कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
कशी झाली चोरी?- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी दाखल होत असतात. रोजाना या एपीएमसीमध्ये हजारो वाहनांची गर्दी असते. निफाड तालुक्याच्या मौजे टाकळी विंचुर येथील कांदा उत्पादक शेतकरी सुरेश बाबाजी काळे यांनीदेखील मंगळवारी होणाऱ्या लिलावासाठी सोमवारी रात्री कांद्याने भरलेले ट्रॅक्टर लासलगाव एपीएमसीमध्ये आणले होते.
या सदर शेतकऱ्याने बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टर लावले आणि जेवणासाठी घरी जावे म्हणून निघाला. यादरम्यान सुरेश यांचा कांदा भरलेली ट्रॉली तिथेच ठेवून अज्ञात भामट्यांनी ट्रॅक्टर चोरीला नेला. ही घटना सोमवारी रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी घडली असावी असा शेतकऱ्याचा अंदाज आहे.
सदर शेतकऱ्याने ट्रॅक्टर चोरीची घटना बाजार समिती प्रशासनाला कळवली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघितली तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिघाड असल्याचे समजले. यामुळे सुरेश बाबाजी काळे यांना मदत मिळावी म्हणून इतर शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आवाज बुलंद केला.
हेही वाचा:-कांदा अखेर बेभरवशाचा! कांद्याच्या दरात मोठी घसरण; कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी सुरेश यांच्या समवेत चोरीची घटना घडली. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे व शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. हे कमी होते की काय म्हणून या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनामुळे मंगळवारी काही काळ बाजार समितीचे व्यवहार बंद होते मात्र बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा एकदा बाजार समितीचा व्यवहार सुरळीत करण्यात आला. बाजार समितीच्या आवारात जर शेतकऱ्यांची वाहने सुरक्षित नसतील तर शेतकरी बांधवांनी शेतमाल विक्रीसाठी कुठे जावे असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने देखील या आंदोलनास पाठिंबा दर्शवला होता.
हेही वाचा:-Onion Crop: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या टिप्स, जाणुन घ्या सविस्तर
Share your comments