पुणे : शेतीत प्रचंड राबूनदेखील नफा होत नाही. शेती करणारी शेतकरी कुटुंब कायम संकटात असतात. आमची प्रगती दूरच; पण तोट्यातील शेतीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नही जमत नाही, अशा करूण शब्दात काही शेतकऱ्यांनी आपली कैफियत केंद्रीय कृषी खर्च आणि मूल्य आयोगासमोर मांडली.
केंद्रीय मूल्य आयोग (सीएसीपी) सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. शुक्रवारी (ता. २०) पुण्यातील साखर संकुलमध्ये आयोगाने पश्चिम राज्यांची एकत्रित बैठक घेतली. या वेळी काही शेतकरी प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते.
आयोगाचे अध्यक्ष प्रा. विजय पॉल शर्मा, सदस्य सचिव अनुपम मित्रा व सदस्य डॉ.नवीन प्रकाश सिंग यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे आस्थेने ऐकून घेतले. शेतकरी प्रतिनिधी म्हणून रामेश्वर दुधाटे, रवींद्र मेटकर, शुभंम महल्ले (महाराष्ट्र), हितेंद्र पटेल, रमेशभाई पटेल (गुजरात), इश्वर केठवास (मध्य प्रदेश) यांनी आयोगासमोर विविध मुद्दे मांडले.
एरवी आयोगाच्या बैठकीत मुद्द्याला सोडून कुणी इतर बाबी सांगत असल्यास आयोगाकडून त्याला जाणीव करून दिली जात असते. मात्र, तीन शेतकऱ्यांनी आपल्या भाषणात थेट लग्नाचा मुद्दा मांडला.
त्यावर आयोगाने अजिबात आक्षेप घेतला नाही. हा भावनिक मुद्दा शेतकऱ्याकडून मांडला जात असताना आयोगासह सर्वच शासकीय अधिकारी स्तंभित झाले होते. सर्व शेतकऱ्यांना त्यांचे मुद्दे मांडू देण्यात आले. परंतु, सामाजिक मुद्द्यांवर अधिकाऱ्यांनी भाष्य केले नाही.
‘‘साहेब, तोट्यातील शेतीमुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शेतकरी व शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी लागेल. सध्या ग्रामीण भागातील तरुण मजूर होण्यास तयार असतात; मात्र शेतकरी होण्यास कोणीही तयार नाही.
कारण, त्याची शेतीत प्रगती होत नाही. त्याला लग्नासाठी मुलगी देण्यास आता कोणी पुढे येत नाही,’’ असा मुद्दा एका शेतकऱ्याने कळकळीने आयोगासमोर मांडला. या समस्येवर काय बोलावे हे आयोगाला समजेना.
या मुद्द्यावर बैठकीतील सारेच अधिकारी स्तंभित झाले होते. ऐरवी हमीभावाचाविषय सोडून इतर विषय कोणी भाषणात काढला तर मुद्दाचे आणि थोडक्यात बोला, असे सांगितले जात होते. परंतु, या लग्नाच्या मुद्द्यावर सारे सभागृह गप्प होते.
राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण; तर 'या' ठिकाणी पावसाची शक्यता
Share your comments