शेतकऱ्यांनी एकात्मिक कृषी व्यवसायाकडे वळावे

16 January 2019 07:49 AM


चंद्रपूर:
नवनवीन तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, क्लस्टर निर्मिती, जोडधंद्याची उपलब्धता व योग्य प्रशिक्षण या पंचसूत्रीचा अवलंब करून एकात्मिक कृषी व्यवसायाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वळवा. त्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणण्यासाठी सर्व शासकीय विभागाने प्रयत्न करावा. शेतीची सुपिकता वाढविणे हाच एकमेव विकासाचा महामार्ग आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राउंडवर 11 ते 15 जानेवारीपर्यंत जिल्हा कृषी प्रदर्शनी व सरस महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी समाजातील सर्वात प्रामाणिक घटक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य शिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर यांनाही खास निमंत्रित करण्यात आले होते. या दोघांनीही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत वाघमारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मनपाचे  उपआयुक्त भालचंद्र बेहरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना कृषी महोत्सवाच्या या व्यासपीठावर दोन विद्यापीठांचे कुलगुरू आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. शेती हा व्यवसाय फायद्याचा व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. कृषी विद्यापीठांमध्ये एकात्मिक कृषी व्यवसाय या प्रकल्पामध्ये अडीच एकराच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न एकरी चार लाख रुपये कसे होईल याचे प्रात्यक्षिक आपण स्वतः बघितले. त्यामुळे नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करणे अत्यंत आवश्यक आहे. शेती, जोडधंदा, प्रशिक्षण अशा माध्यमातून एकात्मिक कृषी व्यवसाय शक्य आहे.

जिल्ह्यामध्ये काही प्रयोग सुरू झाले आहेत. चंद्रपूरमध्ये धान उत्पादक पाच हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम सध्या सुरू आहे. कृषी विद्यापीठांनी प्रत्येक विभागातील दहा दहा गावे दत्तक घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना कमी जमिनीमध्ये कशा पद्धतीने भरघोस पीक घेता येतात याचे प्रात्यक्षिक द्यावे. यासाठी लागणारा खर्च शासन उचलेल पण कृषी विद्यापीठे हे कृषी आर्थिक क्रांतीचे केंद्र झाली पाहिजेत. विद्यापीठाचे प्रयोग प्रत्यक्षात उतरले पाहिजेत. यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पशुसंवर्धन व मत्स्य विद्यापीठाने चंद्रपूर जिल्हा दत्तक घ्यावा अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी त्यांनी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या शेती विकासासंदर्भातल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली. अनुसूचित जातींच्या महिलांना शंभर टक्के अनुदानावर ट्रॅक्टर देण्याची मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. यासाठी अनुसूचित जातीच्या बचत गटांनी पुढे यावे,असे आवाहनही त्यांनी केले. चंद्रपूर जिल्हा हा जंगलव्याप्त जिल्हा आहे. या ठिकाणी वन्य जिवाचा धोका संभवतो. तसेच रानडुक्कर व रोही यांचा देखील विभागांमध्ये त्रास आहे. रानडुक्कर आणि रोही यांच्यापासून शेतीचे नुकसान झाल्यास त्यांना मोबदला द्यावा हा कायदा लवकरच सरकार करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कायद्यान्वये 15 दिवसाच्या आत नुकसान भरपाई मिळेल अशी घोषणा त्यांनी केली.

यावेळी त्यांनी एका पंचसूत्रीची मांडणी करताना नवीन तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, क्लस्टर निर्मिती, जोडधंद्याची उपलब्धता व योग्य प्रशिक्षणाची आवशकता दोन्हीही कुलगुरू पुढे व्यक्त केली. या कृषी प्रदर्शनीमध्ये कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोगाची चर्चा, चिंतन व मनन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्लस्टर निर्मितीची संधी आहे. चिमूरमध्ये हळदीचे तर कोठारी व जिवती या परिसरात भाजीपाल्याचे क्लस्टर उभे राहू शकते. यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कोणत्या भागात कुठल्या पिकाचे क्लस्टर उभारायचे याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या.

जिल्ह्यामध्ये जे.के. ट्रस्टच्या मदतीने दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरीचे जाळे विणले जात आहे. स्वीट क्रांतीला मधुमक्षिका पालनातून  जिल्ह्यात सुरुवात झाली. एक हजार आदिवासी महिलांच्या निर्मितीच्या कंपनीला देखील चालना दिली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यामध्ये सॉइल हेल्थ कार्ड देताना सोबतच विशिष्ट जमिनीमध्ये कोणते पिक घ्यावे याबाबतचे मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनीची आवश्यकता त्यांनी विषद केली. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. चांदा क्लब वरील सुंदर आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील चमूचे कौतुक करताना जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञान समजून घ्यावे, यशस्वी शेतकऱ्यांनी आपले स्टॉल उभारले आहेत. त्यांच्यापासून अनुकरण घ्यावे, प्रशिक्षण घ्यावे. तसेच वेगवेगळ्या विषयांवर चालू असणाऱ्या मंथनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले. 

Sudhir Mungantiwar सुधीर मुनगंटीवार विषमुक्त शेती chemical free Maharashtra Animal & Fishery Sciences University महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
English Summary: Farmers should turn to integrated agriculture business

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.