MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

वन्य प्राण्यांमुळे कोल्हापुरातील शेतकरी त्रस्त; पिकांचे नुकसान

कोल्हापूर: जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्यांत वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत्याने शेतकरी त्रस्त आहेत. उभ्या पिकांतून हे प्राणी चालत जरी गेले तरी त्यातून मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा आहे. हत्ती, गवे, मोर आणि पक्ष्यांनी शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे.

KJ Staff
KJ Staff

कोल्हापूर: जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्यांत वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत्याने शेतकरी त्रस्त आहेत. उभ्या पिकांतून हे प्राणी चालत जरी गेले तरी त्यातून मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा आहे. हत्ती, गवे, मोर आणि पक्ष्यांनी शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात दहशत निर्माण केलेले टस्कर गेल्या चौदा वर्षांपासून येथे ठिय्या मांडून आहेत. एक गेला की दोन-तीन येतात. त्यानंतर पिलांसह कळप येतात. पण हत्तींचा वावर काही टळत नाही. खाणे कमी पण नुकसान जास्त करत असल्याने हत्ती शेतीच्या मुळावर उठला आहे.

हत्तीचे संकट नेहमीचे झाल्याने वनविभागाकडूनही पंचनामे करण्यास टाळा-टाळ केली जाते.  आजऱ्यातील लाटगाव, आवंडी,  चाळोबा, धनगरमोळा, आंबोली सारख्या परिसरातील घनदाट जंगले, 'चित्री'सारखे पाणीप्रकल्प, 'हिरण्यकेशी'वरील अनेक बंधारे असे पिण्यासाठी आणि डुंबण्यासाठीचे मुबलक पाण्याचे साठे असल्याने हत्तींचा वावर आहे.  ऊस, भात, नाचणीचे हिरवेगार शेती, माडाची झाडे, बांबूचे बन, काजू, नारळ, केळीच्या बागांसारखे भरपूर खाद्य आणि शासनाच्या आदेशामुळे मिळालेले अभय यामुळे हत्तींचे येथून हलणे दुरापास्त झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत तर हत्ती वाद्ये, मशाल, फटाके, सुरबाण, मिरची धूर अशा कोणत्याही उपायांना दाद देत नाही. त्यामुळे हत्तींनी आतापर्यंत केलेले कोट्यावधी रुपयांचे नुकसान जसे सहन केले, त्याचीच 'री' ओढण्याशिवाय गत्यंतर नाही.

मागील वर्षात हाळोली, मसोली, गवसे आणि वेळवट्टी परिसरात एकच टस्कर होता. त्याच्या उच्छादाने तालुक्याचा पश्चिम भाग त्रस्त होता. दिवसाढवळ्या आंबोली मार्ग अडविणाऱ्या या हत्तीने सर्वांची झोप उडवली होती. आता आणखी एक टस्कर धनगरमोळा-सुळेरान परिसरात अवतरला आहे. त्याचा उच्छादही सुरू झाला आहे. कोरोनाच्या धामधुमीत शेतीवाडीत कष्ट करून समाधानाने पेरण्या आणि लावणी केलेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात सध्या हत्तींचा धुडगूस सुरू आहे.

राधानगरी तालुक्यात गव्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. हे गवे कळपाने येतात आणि उभ्या पिकातून पळत जातात. एरवी उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात येणारे हे गवे पावसाळ्यात जंगलात मुबलक पाणी असूनही गावांत घुसत आहेत. माणसांची चाहूल लागताच ते पळून जात होते, मात्र, आत्ता मानवी वस्तीत त्यांचा राजरोस वावर सुरू आहे.  चंदगड आणि आजरा तालुक्यात मोर, कवडे आदी पक्ष्यांचा मोठा त्रास सुरू झाला आहे. या पक्ष्यांनी उगवून आलेले सोयाबीन, भूईमूग फस्त केला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट समोर आहे.

English Summary: Farmers in Kolhapur suffer due to wild animals, crop damage Published on: 23 July 2020, 04:14 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters