राज्यातील शेतकरी अनेक अस्मानी संकटांना तोंड देत शेती पिकवत आहे. वाढत्या खतांच्या दराने पिकाचा उत्पादन खर्च शेतकऱ्याला डोईजड होऊ लागला आहे. मात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये खताची कमतरता भासणार नाही यांची दक्षता घेण्याचे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. तसेच खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना नियमित खते उपलब्ध करून द्यावीत.
डीएपी आणि युरिया खताचा साठा केल्याचे आढळल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या नुकतीच बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह विविध खत कंपनी, बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात खरीप पिकाचे क्षेत्र वाढत असून बी-बियाणे आणि खतांची मागणी वाढत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना खते आणि बियाणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शासकीय दराप्रमाणे इ- पॉश मशिनवर खताची विक्री केली जावी तसेच कंपन्यांनी खताचा साठा किती आहे. शिवाय खते कधी उपलब्ध होतील याची आगावू माहिती कृषी विभागाला देणे बंधनकारक आहे. खते- बियाणे कंपन्यांनी कृषी विभागाशी समन्वय ठेवून आपला खतांचा साठा इतर राज्यात, जिल्ह्यात जाणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचनाही शंभरकर यांनी दिल्या.
येणाऱ्या खरीप हंगामासाठी युरिया आणि खते कमी पडणार नाही, वितरण व्यवस्था सुधारा, खतांच्या पुरवठा, दर्जा आणि किंमतीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी खत वितरकांना केल्या. रब्बीबरोबर खरिपाचे क्षेत्रही वाढले असल्याने खते आणि बियाणे मोठ्या प्रमाणात लागणार आहेत. शेतकऱ्यांना बायो फर्टिलायझर, नॅनो युरिया याबाबत माहिती द्यायला हवी.
कोणत्यावेळी कसे खत द्यावे, जमिनीतून द्यावे की स्प्रेद्वारे द्यावे, याची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी मेळावे घेण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे. २१ एप्रिल २०२२ अखेर खतांची मागणी, साठा याचा आढावा घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यावर्षी पावसाचे देखील प्रमाण चांगले असणार आहे. यामुळे शेतीच्या कामाची तयारी शेतकरी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
अवकाळी पावसाचा धुमाकूळ; वीज कोसळून तीन गायींचा बळी
Sugarcane; उसाच्या खोडव्याचे टनीज का घटतय? शेतकऱ्यांनो असे करा व्यवस्थापन...
अखेर पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पैसे जमा..
Share your comments