यावर्षी विचार केला तर जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने मुंबईची दाणादाण उडवली होती. सुरुवातीला चांगला आलेल्या पावसाने मात्र काही दिवसानंतर म्हणजेच उरलेला जून महिना पूर्ण पणे कोरडाच काढला. तसेच मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य भागातील पावसाने दडी मारली होती. परंतु गुरुवार पासून म्हणजेच 8 जुलै पासून हे चित्र थोडेसे बदललेले पाहायला मिळाले.
हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी एका ट्विटरद्वारे सांगितले की महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याची माहिती दिली आहे.
सात जुलै रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी अर्धा तास बऱ्यापैकी पाऊस झाला होता. गुरुवारी मात्र सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाल्याचं मुंबईकरांना पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी देखील चिंताग्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दहा जुलै पासून पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. कारण पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. अरबी समुद्र मधून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असून त्यामुळे गुरूवारपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच पुढच्या दोन दिवसात म्हणजेच 10 जुलैपासून पाऊस राज्यात जोर पकडेल तसेच मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, नागपूर, वर्धा तसेच मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकेल अशी आशा वर्तविली जात आहे. हवामान खात्याने 10 जुलै रोजी मुंबई तसेच ठाणे इत्यादी तुरळक ठिकानी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गात दहा तारखेला तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुणे, कोल्हापूर, सातारा इत्यादी जिल्ह्यात तुरळक भागात अतिवृष्टी होईल अशी शक्यता वर्तवली आहे. 11 जुलै रोजी मुंबई ठाण्यासह कोकण विभाग तसेच मध्य महाराष्ट्रातील संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस तसेच अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यात मुसळधार तर मराठवाड्यात एका ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Share your comments