1. बातम्या

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनरेगाच्या कामांमध्ये वाढ

KJ Staff
KJ Staff


मुंबई: 
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील मजुरांना ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलद गतीने कामे उपलब्ध करून दिली जात आहेत. या योजनेअंतर्गत 2019-20 या वर्षामध्ये 98.31 टक्के कामांची मजुरी विहित वेळेत अदा करण्यात आली आहे. राज्यात चालू आठवड्यात मजूर उपस्थितीमध्येही वाढ झाली असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनरेगाच्या कामांची मागणी होताच कामे तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रोहयोमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

संपलेल्या आठवड्यामध्ये मागील आठवड्यापेक्षा मजूर उपस्थितीमध्ये 33 हजार 969 ची वाढ झाली आहे. राज्यात सध्या एकूण 38 हजार 811 कामे चालू असून त्यावर 3 लाख 77 हजार 328 इतकी मजूर उपस्थिती आहे. एकूण 5 लाख 79 हजार 481 इतकी कामे शेल्फवर असून यामध्ये मजूर क्षमता 1290.71 लाख मनुष्य दिवस इतकी आहे. शेल्फवरील कामांपैकी 4 लाख 74 हजार 189 कामे ग्रामपंचायतीकडे आणि उर्वरित 1 लाख 05 हजार 292 कामे तालुका यंत्रणेकडे आहेत.

या योजनेंतर्गत राज्यामध्ये सन 2018-19 या वर्षात 17.93 लाख कुटुंबातील 32.76 लाख मजुरांना मजुरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चालू वर्षी सन 2019-20 या वर्षात आतापर्यंत एकूण 5.32 लाख कुटुंबातील 9.06 लाख मजुरांना मजुरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 2019 या वर्षाकरिता एकूण 10 कोटी मनुष्य दिवस निर्मिती अंदाजण्यात आलेली आहे. मे 2019 अखेर पर्यंत एकूण 3 कोटी मनुष्य दिवस निर्मिती अंदाजण्यात आलेली आहे. 2018-19 या वर्षात 8 कोटी 46 लाख मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे.

2019-20 या वर्षात राज्यात आतापर्यंत एकूण 257.70 कोटी रुपये इतका खर्च झालेला असून, 230.51 कोटी रुपये इतका अकुशल मजुरीवरील खर्चाचा समावेश आहे. 2018-19 या वर्षामध्ये एकूण रुपये 3 हजार 289 कोटी रुपये इतका खर्च झालेला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters