जागतिक बाजारात पॉलिमरच्या किमतीत भरमसाट वाढ होत असून राज्यातील प्लॉस्टिक प्रक्रिया उद्योगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे ठिबक संच, पीव्हीसी पाईप, शेततळ्याचा कागद अशा कृषी सिंचन साधनांचा निर्मिती खर्च सतत वाढत असल्याने उद्योजक हैराण झाले आहेत. याविषयीचे वृत्त अॅग्रोवनने दिले आहे.
प्लॉस्टिक तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिमर्सच्या विविध श्रेणींच्या किमतीत गेल्या पाच - ते सहा महिन्यांपासून ३० टक्क्यांपासून थेट १५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या वाढीसाठी जागतिक बाजारातील घडामोंडीबरोबरच देशातील पेट्रोकेमिकल्स कंपन्या देखील जबाबदार असून शकतात. केंद्राने यात लक्ष न घातल्यास ठिबकासह कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सर्व प्लॉस्टिक अधारित वस्तूंच्या दरांमध्ये सतत वाढ होत जाईल, अशी भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे. शेततळ्यासाठी लागणाऱ्या प्लॉस्टिक पेपर निर्मितीमधील आदी इंडस्ट्रिजचे अध्यक्ष चंद्रकांत कालाणी म्हणाले , की १८ टक्के जीएसटी लादून आधीच प्लॉस्टिक पेपरनिर्मिती उद्योगाचे कंबरडे मोडले आहे.
त्यात अलीकडे काही दिवसांत कच्चा मालाच्या किमतीत ३५ टक्के वाढ झाली. त्यामुळे आमचा प्लॉस्टिक पेपर, ताडपत्री, मल्चिंग पेपरचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 'इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडिया'चे उपाध्यक्ष कृष्णात महामुलकर म्हणाले , की गेल्या तीन महिन्यात पीव्हीसी पाईपचे दर ५० टक्क्यांनी वाढले आहेत. प्लॉस्टिक उत्पादनांचा सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर होतो. पीव्हीसी, एचडीपीई पाईपशिवाय शेतीला पाणीपुरवठा अशक्य असतो. राज्याच्या ग्रामीण भागातील खासगी, सहकारी किंवा वैयक्तिक पाणीपुरवठ्याचे छोटे-मोठे प्रकल्प देखील मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिक पाइप वापरतात. प्लॉस्टिक आधारित सिंचन साधनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कच्चा मालाचे महागलेले दर काळजीत टाकणारे ठरत आहेत.
सूत्राच्या म्हणण्यानुसार, कच्चा मालाच्या किमती वाढल्याने गुजरातमधील पाच हजारांहून अधिक प्लॉस्टिकनिर्मिती उद्योगांना उत्पादन घटवावे लागले आहे.बहुतेक कंपन्या आता केवळ ५० टक्के क्षमतेने निर्मिती करीत आहेत. पेट्रोकेमिकल्स कंपन्यांकडून पॉलिमर्सची कृत्रिम टंचाई तयार केली जात असल्याचा संशय प्लॉस्टिकनिर्मितीमधील उद्योगांचा आहे. ठिबक संच निर्मितीमधील कोठारी ग्रुपचे विपणन संचालक पुष्कराज कोठारी म्हणाले ''गेल्या वर्षीच्या तुलनेत पॉलिमर्सच्या दरात ७० ते ८० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे पीव्हीसी पाइप.ठिबक व तुषार संच उत्पादनातील खर्चात झपाट्याने वाढ झालेली आहे. हा उत्पादन खर्च वाढल्याने व अनुदान विलंबामुळे शेतकऱ्यांकडून ठिबक संच मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी, कंपन्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे या समस्येचा आढावा घेऊन तातडीने धोरणात्मक बदल सरकारी पातळीवर होणे अत्यावश्यक आहे''.
हेही वाचा : महिला सक्षमीकरणासाठी एचडीएफसी बँकेचा नवा प्रोग्राम
थर्मोप्लॉस्टिक पॉलिमर किमतीत भरमसाट वाढ. गेल्या डिसेंबरमध्ये १०६ रुपये किलोने मिळणारे पॉलिमर आता २७० रुपयांच्या पुढे गेले. पॉलिव्हिनाइलक्लोराइडचे (पीव्हीसी) दर ७५ रुपये किलोवरुन १२७ रुपयांपर्यंत वाढले. जागतिक बाजारात पॉलिमरचे भडकलेले दर आणि पेट्रोकेमिकल्स कंपन्यांकडून पॉलिमरचा खंडित व कमी पुरवठा झाला आहे.
यामुळे प्लॉस्टिकवर देशभरात प्रक्रिया करणाऱ्या ५० हजारापेक्षा जास्त उद्योगांना मोठा आर्थिक फटका,एकट्या गुजरातमधील १२ हजार उद्योगांपैकी निम्मे उद्योग संकटात आहे.
Share your comments