पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जात असल्याचे चित्र नजरेस पडत आहे, फक्त नाशिक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात यावेळी उन्हाळी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग बघायला मिळत आहे. खरीप व रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकरी राजांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, मात्र या अधिकच्या पावसामुळे उन्हाळी लागवडीसाठी मुबलक पाण्याचा साठा निर्माण झाला आणि याच कारणास्तव राज्यातील अनेक भागात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.
राज्यात उसानंतर सर्वात मोठे नगदी पीक म्हणून कांद्याची ओळख आहे, मात्र असे असले तरी कांद्याला बेभरवशाचे पिक म्हणूनच संबोधले जाते, कारण कांद्याच्या बाजारभावात नेहमीच कमालीची चढ-उतार नजरेस पडत असते. मात्र या वेळी परिस्थिती थोडीशी भिन्न असल्याचे दिसत आहे, गेल्या अनेक दिवसापासून कांद्याचे बाजार भाव कमालीचे स्थिर बनले आहेत. तसेच उन्हाळी कांद्यासाठी वातावरण पोषक आहे त्याबरोबरच यावर्षी अधिकच्या पावसामुळे पाण्याचा देखील मुबलक साठा शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यात उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकरी जास्त आकृष्ट असल्याचे समजत आहे. शेतकऱ्यांकडे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असला तरी, उन्हाळी कांद्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे ठरणार आहे. कृषी वैज्ञानिकांच्या तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जर पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तसेच ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून उन्हाळी कांदा लागवड केली तर यामुळे पाण्याची बचत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार नाहीत या सोबतच उन्हाळी कांदा पिकातून ठिबक सिंचन प्रणालीमुळे उत्पादनात देखील कमालीची वाढ होऊ शकते.
ठिबक सिंचन प्रणालीचे काही महत्वाचे फायदे
शेतकरी मित्रांना अनेक कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी उन्हाळी कांदा लागवडीसाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ठिबक सिंचन प्रणालीमुळे पाण्याचा अपव्यय टाळता येणे शक्य होते, तसंच यामुळे सर्वात मोठा फायदा म्हणजे सर्व कांदा पिकाला एकसमान पाणी याद्वारे दिले जाते. तसेच यातून लिक्विड स्वरूपातील खत देखील कांदा पिकाला देता येणे शक्य असते, त्यामुळे खतांची देखील मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे सांगितले जाते. ठिबक सिंचन प्रणाली द्वारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते शिवाय विद्राव्य खतांचे देखील योग्यरीत्या व्यवस्थापन केले जाते म्हणून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्याने उत्पादनात वाढ होत असल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले.
या समवेतच ठिबक सिंचन प्रणालीचा अजून एक फायदा म्हणजे राज्यात गेल्या अनेक दिवसापासून विजपुरवठामध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी समोर येत आहे त्यावर देखील ठिबक सिंचन प्रणाली कारगर सिद्ध होते. फ्लड पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री कांद्याच्या वावरात पाण्यात उभे राहावे लागते मात्र ठिबक सिंचन प्रणालीत केवळ मोटार चालू करण्याचे काम असते आणि कांद्याला पाणी दिले जाते.
Share your comments