
E-Panchnama App News
नागपूर : नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने राबविलेल्या ‘ई-पंचनामा ॲप’ या अभिनव उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना वर्ष २०२३-२४ चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्काराने गौरविण्यात आले.
सह्याद्री राज्य अतिथीगृहात वर्ष २०२३-२४ आणि वर्ष २०२४-२५ चे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार प्रदान करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यावेळी उपस्थित होत्या. १० लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विविध प्रकारच्या १२ नैसर्गिक आपत्तीच्या वेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी ‘ई-पंचनामा ॲप’ तयार करण्यात येऊन डीबीटीद्वारे थेट मदत देण्याचा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल विभागीय आयुक्त कार्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीची मदत वेळेत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांच्या संकल्पनेतून ‘ई पंचनामा ॲप’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. डिसेंबर २०२२ मध्ये ॲप तयार करण्यास सुरवात झाली आणि एप्रिल २०२३ मध्ये ॲप तयार झाले. यापूर्वी पंचनामे करायला दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागायचा या ॲपमुळे पंचनामे सात दिवसात व्हायला लागले. मे आणि जून २०२३ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार, तलाठी यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर नागपूर विभागात या ॲपद्वारे पंचनामे करण्यात आले. ॲपद्वारे पंचनाम्याचा देशातील पहिलाच प्रयोग नागपूर विभागात यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ई पंचनामा ॲपचा उपयोग करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्यासाठी वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 या दोन वर्षात राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान” राबविण्यात आले. यात सहभागी होवून या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका, नागपूर, चंद्रपूर, वर्धा व भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हा परिषद आणि गडचिरोली जिल्ह्यातील नायब तहसिलदार यांना वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 चे प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Share your comments