विद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा

Monday, 19 August 2019 08:17 AM


परभणी:
वनामकृवितील कोरडवाहु संशोधन प्रकल्‍पास यावर्षी राष्‍ट्रीय पातळीवरील भारतीय कृषी संशोधन परिषदेचा वसंतराव नाईक पुरस्‍कार प्राप्‍त झाला. ज्‍या हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांचे नावे हे विद्यापीठ आहे, त्‍यांच्‍याच नावे असलेला हा पुरस्‍कार प्राप्‍त झाला, ही अतिशय गौरवाची बाब आहे. मराठवाड्यातील बहुतांशी शेती ही कोरडवाहु आहे, त्‍यामुळे कोरडवाहु शेतीस सक्षम करण्‍याचे तंत्रज्ञान जे विद्यापीठाने विकसित केले, या तंत्रज्ञानाला पारितोषिकाच्‍या माध्‍यमातुन जगमान्‍यता मिळाली आहे. मराठवाडा सातत्‍याने दुष्‍काळाच्‍या छायेत वावरत आहे, यावर्षींचीही परिस्थिती समाधानकारक नाही, अशाच परिस्थितीत विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचा खऱ्या अर्थाने कस लागत असतो. त्‍यामुळे विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी कोरडवाहु शेती तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार शेतकऱ्यांमध्‍ये करून कोरडवाहु शेतीला बळकट करण्‍याकरिता हातभार लावावा.

पारितोषिकापेक्षाही शेतकऱ्यांच्‍या जीवनात आर्थिक स्‍थैर्य आल्‍यास दुसरा मोठा आनंद नाही, यासाठी झोकुन प्रयत्‍न करा, असा सल्‍ला कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात देशाच्‍या 73 व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले, यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री. रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री. एन. एस. राठोड, विद्यापीठ अभियंता डॉ. अशोक कडाळे, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्या डॉ. हेमां‍गिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ. तुकाराम तांबे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, यावर्षी कापसावरील बोंडअळी व मकावरील लष्‍करी अळीचे संकट उभे ठोकले असुन या किडींचे व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान प्रसारासाठी विस्‍तार यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवावी लागेल. सांगली व कोल्‍हापुर जिल्‍हयात महापुराग्रस्‍त नागरिकांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार मुख्‍यमंत्री सहाय्यता निधी देण्‍याचे सकारात्‍मक प्रतिसाद दिला असुन या माध्‍यमातुन त्‍यांच्‍या पाठिशी उभे राहु. विद्यापीठास राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत जागतिक बॅकेच्‍या अर्थ सहाय्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या माध्‍यमातुन डिजिटल शेतीवर आधारित राष्‍ट्रीय प्रकल्‍प सेंटर ऑफ एक्सेलन्‍स मंजुर झाला आहे, ही गौरवाची बाब आहे.

आज भारतीय शेती डिजिटल क्रांतीच्‍या उबंरठावर उभी आहे, डिजिटल माध्‍यमातुन शेतीस अधिक बळकट करण्‍याकरिता प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन जे तंत्रज्ञान विकसित होणार आहे, तसेच परदेशातील शास्‍त्रज्ञांशी आपल्‍या शास्‍त्रज्ञांशी विचारांचे देवाणघेवाण होणार आहे, यातुन विद्यापीठाची प्रतिमा उजळुन निघणार आहे. हा प्रकल्‍प केवळ संधी नसुन फार मोठे आव्‍हान आहे, हे आव्‍हान सर्वांच्‍या सहकार्याने निश्चितच पेलु शकतो. स्‍वच्‍छ, सुंदर व हरित विद्यापीठाचे स्‍वप्‍न पाहात आहोत, वृक्षरोपणाचा कार्यक्रम केवळ परभणी मुख्‍यालय नव्‍हे तर संपुर्ण मराठवाडयातील विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर राबवित आहोत, परभणीकरही हे स्‍वप्‍न साकारण्‍यासाठी पुढे सरसावले आहेत.

यावर्षी विद्यापीठात विविध राज्‍यातील सुमारे 200 विद्यार्थ्‍यी प्रवेश घेत आहेत, विविध राज्‍याचा सांस्‍कृतिक वारसा घेऊन हे विद्यार्थ्‍यी येतात यांच्‍या माध्‍यमातुन मराठी भाषिक विद्यार्थ्‍यांना व्यक्‍तीमत्‍व विकासासाठी संधीचे मोठे दालन उघडणार आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त करून राष्‍ट्रीय पातळीवर विद्यापीठाच्‍या मानाकंनात सुधारण्‍यासाठी सर्वानी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन केले व स्‍वातंत्र्य दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी छात्रसेना अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांच्‍या नेतृत्‍वाखाली माननीय कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोरडवाहू शेती Dry land Agriculture वसंतराव नाईक भारतीय कृषी संशोधन परिषद Indian Council of Agricultural Research digital farming डिजिटल शेती

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.