अकोला: विदर्भात कापूस, सोयाबीन व धान प्रमुख पीक आहे. पावसाळी वातावरण आणि सतत ढगाळ वातावरणामुळे कापूस, सोयाबीन पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या काही भागात बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवे आव्हान उभे ठाकले आहे. आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला असून, अधून-मधून पाऊस सुरूच आहे. गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे.
कपाशीवर अगोदरच बोंडअळीने आक्रमण केले आहे. आता या वातावरणामुळे रस शोषण किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तसेच विविध रोगराई वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून, सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत; परंतु सध्या सोयाबीनच्या खोडामध्ये कीड आढळली. परिणामी, सोयाबीन शेंगांना अन्नद्रव्याचा पुरवठा होत नसून, पूर्ण सूर्यप्रकाश मिळत नसल्याने सोयाबीन शेंगांचे दाणे भरण्यास अडचणी येत आहेत. शेंगा अपरिपक्व असल्याचे दिसत आहे.
यावर्षी अनेक उपाययोजना करूनही बोंडअळीने तोंड वर काढले असून, या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी विविध पर्याय करून बघितले; पण अळी जुमानायला तयार नसल्याने अगोदरच हवालदिल झाला असताना आता नव्या कीड, रोगाच्या संकटाने तोंड वर काढले.
Share your comments