नाशिक: येणाऱ्या काळात कृषी मालाची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार असून कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ती अधिक तीव्रतेने जाणवणार आहे, त्यामुळे 2020 वर्ष हे ‘कृषी उत्पादकता वर्ष’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. तसेच खते, बियाणे व त्याच बरोबर शेतकऱ्यांना लागणारे पीक कर्ज थेट उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडलेल्या खरीप हंगाम 2020 पूर्व आढावा बैठकीत कृषिमंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, यांचेसह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत जगाबरोबरच शेतकरीही अडचणीत सापडलेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने पिकवलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग सक्रिय आहे. कृषी उत्पादनांच्या बाबतीत शेतकरी व राज्य जास्तीत जास्त पुढे राहील या दृष्टीकोनातून 2020 वर्ष हे कृषी उत्पादकता वर्ष म्हणून साजरा करणार आहोत. तसेच कृषी उत्पादनाची साठवणूक, वाहतूक व त्यावरील प्रक्रिया यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने त्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे काम सुरु आहे. गटशेती व फार्मास्युटिकल कंपन्यांच्या माध्यमातून शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असेही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
खते, बियाणे यांचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही
सध्याच्या स्थितीत शेतकरी अडचणीत असून त्याला खते, बियाणे याची कमतरता भासणार नाही, याची काळजी कृषी विभागामार्फत घेतली जाईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन सध्या करणे गरजेचे असल्याने थेट बांधावर बियाणे, खते कृषी विभागामार्फत पोहचविली जात आहेत. तसेच बांधावरचा भाजीपाला घरोघरी शेतकऱ्याच्या माध्यमातून पोहोचविला जात आहे. त्यासाठी वाहतुकीची परवानगीही दिली आहे. शेतीसाठी वाहतुकीला अडथळा न आणण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे.
अशा परिस्थितीत खते, बियाणे यांचा काळाबाजार साठेबाजी खपवून घेतली जाणार नाही. तसे आढळून आल्यास कितीही प्रतिष्ठीत व मोठी कंपनी असली तरी कठोर कारवाई करण्याचा इशारा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे. बियाणे, खते यांची कमतरता भासणार नाही याची काळजी कृषी विभागामार्फत घेतली जात आहे. नाशिक जिल्ह्यात युरियाचा दर कमी असल्यामुळे शेतकरी त्याची मोठ्या प्रमाणावर मागणी करत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे खास बाब म्हणून युरियाचा अतिरिक्त साठा जिल्हयासाठी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
पीक कर्जांचा आढावा घेऊन नियोजन करण्यात यावे
शेतकरी कर्जाच्या अडचणी प्राथमिकतेने सोडविण्याचे धोरण शासनाचे असल्याने राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँक यांच्या माध्यमातून पीक कर्जाचे प्रमाण व कर्जमाफीचा लाभ याचा जिल्हाधिकारी यांनी लीड बॅक मॅनेजर, जिल्हा उपनिबंधक यांच्या माध्यमातून आढावा घेऊन त्याचे नियोजन करावे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेचा लाभ जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना झाला असून काही ठिकाणी ग्रामपंचायतींच्या निवडणूकांमुळे लाभार्थ्यांची यादी घोषित करण्यात आलेली नाही परंतू अशा लाभार्थ्यांनाही कर्जमुक्त घोषित करण्यात आलेले आहे असे गृहीत धरुन बँकांनी कर्जांचे नियोजन करावे. कुठलाही सर्वसामान्य शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जावी. पिक कर्जाच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच बँकांना सूचना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी होणाऱ्या बैठकीत त्याबाबत पुन्हा विनंती करणार असल्याचेही यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
जग बंद आहे पण शेती बंद नाही : छगन भुजबळ
कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग बंद आहे पण जगात शेती कुठेही बंद नाही अथवा बंद केल्याची घोषणा कुठल्या देशाने, राज्याने अथवा जिल्ह्याने केल्याचे ऐकिवात नाही, त्यामुळेच सर्वत्र बैठका बंद असूनही सोशल डिस्टन्सिंगचे भान राखत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आवश्यक बाब म्हणून ही बैठक घेतली आहे. अडचणी खूप आहेत त्या संपणारही नाहीत. पण शेतकरी सर्वसामान्यांसाठी रक्ताचे पाणी करतो. शेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीप्रमाणे शेतकरी संकटात तर देश संकटात याचे सामूहिक भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे.
आज कोरोनाच्या या संकटात देश, राज्यात आणि जिल्ह्यात जे काही अन्न धान्य वाटप केले जात आहे ते शेतकऱ्याने पिकवलेले आहे. तेही लक्षात ठेवले पाहिजे अशा परिस्थितीत आपण शेतकऱ्याला मदत नाही केली तर तो उत्पादकतेत अपेक्षित परिणाम दाखवू शकणार नाही. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेचा लाभ शेतकऱ्यांना लवकरात लवकर देऊन त्याचा आढावा घेऊन नवीन कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.
शेतीला मिळणार आठ तास वीज
वीज पुरवठयाबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून शेतीला वीजेची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी. वीजेच्या संदर्भात शेतकऱ्यांना ती आठ तास उपलब्ध होईल यासाठी शासनस्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असून ही योजना एक महिन्यात सुरु होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या बैठकीत उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या विविध समस्या कृषी मंत्री व पालकमंत्री यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या बाबतीत व शेतकऱ्याचा माल थेट घेण्याच्या बाबतीत समाजाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगवायचा आणि टिकवायचा असेल तर सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी थेट शेतकऱ्याकडून अन्न धान्य, भाजीपाला व फळे घ्यावीत असे संयुक्त आवाहन यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ व कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे
Share your comments