मुंबई
केंद्र सरकारने २ लाख मेट्रीक टन कांदा खरेदीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तीन-चार दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय पुन्हा जाहीर करून पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना वेड्यात तर काढलं नाही ना? किंवा राज्य आणि केंद्र सरकार मिळून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेड्यात तर काढत नाही ना? असा सवाल करत सरकारवर रोहीत पवार यांनी टीका केली आहे.
आमदार रोहीत पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, राज्य सरकार आणि केंद्र सरकारची अशी ही बनवाबनवी आहे. नाफेडमार्फत अतिरिक्त २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला होता १७ ऑगस्ट २०२३ रोजी. त्याच दिवशी ४० टक्के निर्यातशुल्क लादण्याचाही निर्णय झाला. दोन्ही निर्णय जाहीर झाले २० ऑगस्ट २०२३ रोजी. त्यानंतर निर्यातशुल्क विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली परिणामी राज्य सरकार खळबडून जागं झालं.
पुढे पवार म्हणाले की, राज्याचे कृषिमंत्री दिल्लीत जाऊन वाणिज्य मंत्र्यांशी बैठक करतात. उपमुख्यमंत्री जपानमधून फोन करतात आणि केंद्र सरकार शेतकरी हितासाठी २ लाख टन कांदा खरेदी करणार असल्याचं ट्विटरवरून घोषितही करतात. त्यावर भर म्हणून राज्याचे मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या २ लाख टन कांदा खरेदी करण्याच्या निर्णयाचं अफाट कौतुक करतात. जर २ लाख टन अतिरिक्त कांदा खरेदी करण्याचा निर्णय तीन-चार दिवसांपूर्वीच झाला होता तर मग राज्याच्या कृषिमंत्र्यांनी दिल्लीला जाऊन नेमकी काय चर्चा केली?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी जपानमधून फोनवरून केंद्रीय मंत्र्यांशी काय संवाद साधला? मुख्यमंत्री साहेबांनी केंद्र सरकारचं कशाबद्दल कौतुक केलं? श्रेय घेण्याच्या नादात किती बनवाबनवी करणार? तीन-चार दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय पुन्हा जाहीर करून पियुष गोयल साहेबांनी राज्याचे कृषिमंत्री धनुभाऊ, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना वेड्यात तर काढलं नाही ना? किंवा राज्य आणि केंद्र सरकार मिळून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेड्यात तर काढत नाही ना? असा प्रश्न पडलाय, असं आमदार रोहीत पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Share your comments