
मुंबई: दुग्धविकास विभागाच्या वतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, ‘महानंद’च्या अध्यक्ष मंदा खडसे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांनी सहकारी व खासगी दूध संघांच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलची पाहणी केली. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात राज्यातील विविध विभागातील नामांकित 15 सहकारी व खासगी दूध संघांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून सुगंधित तूप, दही, लोणी, चीज, श्रीखंड, ताक, लस्सी, (फ्लेवर्ड) दूध, पेढे, पनीर, आदी दुग्धजन्य पदार्थांचे सवलतीच्या दरात विक्री करण्यात येत आहे. हे प्रदर्शन 17 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार आणि दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव यांनी या प्रदर्शनाबाबतची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिली.
राज्य शासनाचा ‘आरे’, महाराष्ट्र राज्य दूध महासंघ अर्थात ‘महानंद’, ‘कात्रज डेअरी’, ‘गोविंद’, ‘कृष्णा’, ‘सोनई’, ‘वारणा’, ‘पराग मिल्क’, ‘प्रभात’, ‘गोकुळ’, ‘श्रायबर डायनॅमिक्स’ आदी नामांकित ब्रॅण्डसह एकूण 15 दूध संघांचे स्टॉल यामध्ये विक्री करणार आहेत.