1. बातम्या

महाराष्ट्र-गुजरातेत चक्रीवादळ धडकण्याचा अलर्ट; कोकणात पावसाची शक्यता


मॉन्सूनची प्रतीक्षा सुरू असताना अरबी समुद्र आणि लक्षद्वीपवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते ३ जूनपर्यंत गुजरातची किनारपट्टीवर आणि उत्तर महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अरबी समुद्रासाठी रविवारी दुहेरी दाबाचा अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. दरम्यान आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ  आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात ढग गोळा होऊ लागले आहेत.

 खात्यानुसार, अरबी समुद्रात २ वादळे आकार घेत असून १ आफ्रिकी किनारपट्टीलगतच्या समुद्रावर आहे. ते ओमान आणि येमेनकडे वळण्याची शक्यता आहे. दुसरे वादळ भारताच्या निकट आहे. ते पुढील २४ तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत

दक्षिण-मध्य गुजरात व सौराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. वादळाचा वेग ताशी ११० किमी असू शकतो. मच्छीमारांना ४ जूनपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वादळाचे केंद्र ओमानजवळ असले तरी त्याचा तडाखा महाराष्ट्र आणि गुजरातला बसू शकतो.  या काळात दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ६५ ते ८५ किलोमीटर प्रती तास असा वाऱ्याचा वेग असेल. हा वेग वाढून ३ जून रोजी सकाळी महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ ९० ते ११० किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान  मुंबईमध्ये रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोमवारीही आकाश ढगाळ राहील. तर मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार ३ जून रोजी मुंबईतील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters