कोरोनाने जगभरात कहर माजवला आहे. जगभरात कोरोनोमुळे मृत पावणाऱ्यांची संख्या ७ हजार हून अधिक आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेने गोमूत्र पार्टीचे आयोजन केले होते. गोमूत्र पायल्याने कोरोना दूर होतो, असा दावा हिंदू महासभेने केला होता. यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. माध्यमांनीही त्यांचे वाभाडे काढले होते. पण आता हाती आलेल्या बातमीनंतर सगळ्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
हिंदू महासभेच्या पार्टीनंतर गोमूत्र आणि गायीच्या शेणाचा भाव वाढला आहे. दूधापेक्षा अधिक दराने याची विक्री होत आहे. गोमूत्र ५०० रुपये लिटर प्रमाणे विकले जात आहे तर गायीचे शेण ५०० रुपये किलोने विकले जात आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त दिले आहे. काहींनी गोमूत्र आणि शेणाच्या विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला दुकाने उभारली आहेत. दिल्ली आणि कोलकत्ताला जोडणाऱ्या महामार्गावर शेण आणि गोमूत्रची विक्री केली जात आहे. हिंदू महासभेच्या पार्टीनंतर ही कल्पना सुचल्याची माहिती काही दुकानदारांनी दिली आहे. दरम्यान हिंदू महासभेच्या गोमूत्र पार्टीला जमलेल्या काहींनी विमानतळावर दारुबंदी करुन त्याऐवजी गोमूत्र विकावे, अशी विनंती सरकारकडे करणार असल्याची माहिती दिली होती. कोरोनामुळे आतापर्यंत देशात १४७ जण बाधित झालेत आहेत. तर महाराष्ट्रात ४२ जणांना याची लागण झाली आहे.
Share your comments