देशातील बाजारात कापूस आणि सोयाबीन दबावात असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र दर वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन, सोयापेंड आणि कापूस दरात सुधारणा झाली. पण देशातील शेतकऱ्यांना मात्र दरवाढीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कापूस आणि सोयाबीनचे भाव पुढील काही दिवसांमध्ये वाढू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात आजही कापूस दबावात होता. दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली. मात्र दरपातळी वाढली नाही. आजही कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. काही बाजारांमध्ये कमाल दर काहीसे वाढले होते. पण सरासरी दरपातळी कायम होती. तर गाठींचे भावही ६२ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. एक कापूस गाठ ३५६ किलोची असते. क्विंटलमध्ये रुईचा भाव १७ हजार ४१५ रुपये होतो.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता, कापसाचे म्हणजेच रुईचे प्रत्यक्ष खरेदीतील दर अर्थात काॅटलूक ए इंडेक्स १०२ सेंट प्रतिपाऊंडवर होता. रुपयात सांगायचं झालं तर १८ हजार ४४७ रुपये प्रतिक्विंटल दर होता. मात्र देशातील रुईचा भाव १७ हजार ४१५ रुपये होता. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील रुईचे प्रत्यक्ष खरेदील दर देशातील दरापेक्षा १ हजार ३२ रुपयांनी जास्त आहेत. म्हणजेच देशात कापसाचे भाव जास्त असल्याचा दावा चुकीचा आहे.
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना केवळ स्वप्न दाखवले? अर्थसंकल्पात भरीव काहीही नाही..
वायद्यांमध्ये आज दुपारी ३ वाजेपर्यंत मार्च महिन्यातील डिलिवरीसाठी कापसाचा दर ८५.४३ सेंट प्रतिपाऊंडवर होता. रुपयात हा भाव १५ हजार ४५० रुपये होतो. उद्योग वायद्यातील दराशी देशातील प्रत्यक्ष खरेदीतील दराची तुलना करतात. त्यामुळं देशातील भाव जास्त दिसतो. सोयाबीन बाजाराची स्थिती : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरु आहेत. मात्र सरासरी दरपातळी वाढली.
आज दुपारी तीन वाजेपर्यंत सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे १५.२९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. रुपयात हा भाव ४ हजार ६०२ रुपये प्रतिक्विंटल होतो. तर सोयापेंडचे भाव ४८५ डाॅलर प्रतिटनांवर आहेत. देशात मात्र आजही सोयाबीनचे भाव दबावात आहेत. सोयाबीनला आजही सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये दर मिळाला. देशात सोयाबीन दर वाढतील असा अंदाज होता. पण वाढलेली आवक आणि खाद्यतेलाचे कमी झालेले दर यामुळं दबाव होता.
ऊसतोडणीसाठी उघडपणे पैशाची मागणी, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर वाढले आहेत. त्यामुळं देशातून सोयापेंड निर्यात वाढली. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. याचा देशातील सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो. कापसाचा विचार करता, दरवाढीस पोषक स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चीनसह इतर देशांकडून कापसाला मागणी वाढत आहे. त्यामुळं कापसाचे दर वाढले. परिणामी भारतातून कापूस निर्यातही वाढली. तसंच देशातील कापसाचे वायदेही सुरु होण्याचा अंदाज आहे. यामुळं पुढील काही दिवसांमध्ये कापसाचे भाव वाढू शकतात.
देशातील स्थिती पाहता सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते. तर कापसाचे दर ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहतील. त्यामुळं शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळावे. टप्प्याटप्प्याने कापूस आणि सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले.
महत्वाच्या बातम्या;
पपईच्या हायब्रीड तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, जाणून घ्या कसे..
दूधानंतर आता शेणालाही चांगले दिवस येणार! आता पेट्रोल-सीएनजीवर नाहीतर थेट शेणावर चालणार कार
शेतकऱ्यांनो मुळा पिकवून कमवा चांगला नफा, जाणून घ्या शेतीची पद्धत
Share your comments