मुंबई - कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था घसरली आहे. आता या लॉकडाऊनचा परिणाम नोकऱ्यांवर होताना दिसत आहे. नोकरदार वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेकांना आपल्या भविष्याविषयी चिंता लागली आहे. अशात स्विगीने कर्मचारी कपात करण्याची घोषणा केल्याने खासगी कंपनीतील नोकरदारांवरील संकटाने आपलं रुप गडद केले आहे.
ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. येत्या काही दिवसात देशभरातील ११०० कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीने ई-मेलद्वारे कपातीची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. त्याआधी स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोने आपल्या १३ टक्के कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. स्विगीचे सहसंस्थापक श्रीहर्ष माजेती यांनी सोमवारी एका पत्रात याची माहिती दिली. या पत्रानुसार, फूड डिलिव्हरी व्यवसायावर खोल परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसात हा परिणाम कायम राहिल. मात्र आगामी काळात हा व्यवसाय रुळावर येईल, अशी आशा आहे. परंतु आम्हाला आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची आणि येत्या काळात कोणत्याही प्रकारच्या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी कपातीची गरज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान सर्वाधिक परिणाम कंपनीच्या क्लाऊड किचन बिझनेसवर झाल्याचे श्रीहर्ष माजेती यांनी सांगितले. जे व्यवसाय पूर्णत: अस्थिर होण्याची शक्यता आहे किंवा पुढील १८ महिन्यांपर्यंत त्यांचा काहीच उपयोग नसेल, ते व्यवसाय आम्ही बंद करणार असल्याचे माजेती यांनी स्पष्ट केले. क्लाऊड किचन म्हणजे असे स्वयंपाकघर जिथे ऑनलाईन ऑर्डरच्या आधारावर अन्नपदार्थ बनवून ऑनलाईन माध्यमातूनच डिलिव्हरी केली जाते. ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल, त्यांना कमीत कमी तीन महिन्यांचा पगार, अॅक्सिलिरेटेड वेस्टिंग, डिसेंबरपर्यंत आरोग्य विमा आणि कंपनीत त्यांनी जेवढी वर्षे काम केले त्यात प्रत्येक वर्षासाठी एक महिन्याचं अतिरिक्त पगार दिला जाईल, असेही माजेती यांनी सांगितले आहे.
Share your comments