रेशीम दिनानिमित्त जालन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Wednesday, 14 August 2019 07:50 AM


मुंबई:
कृषी आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी जालना येथे येत्या 1 सप्टेंबर 2019 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी मेळावा, चर्चासत्र, रथयात्रा, रेशीम वस्त्र प्रदर्शन आणि विक्री तसेच रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली. रेशीम दिन कार्यक्रमाची रुपरेखा ठरविण्यासाठी मंत्रालयात आज बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

रेशीम दिन कार्यक्रमासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. रेशीम उद्योगाबाबत जनजागृती व्हावी यासाठी राज्यातील सर्व रेशीम शेतकरी, रेशीम उद्योजक, अधिकारी कर्मचारी कार्यरत असतात. राज्यात रेशीम विस्तार व विकास मोठ्या प्रमाणात होत असून मागील तीन वर्षांपासून ‘महा रेशीम अभियान’ राबविण्यात येत असून शेतकऱ्यांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

राज्यातील हवामान हे रेशीम उद्योगाला पूरक आहे. लहरी हवामानामुळे शेतीत होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना या उद्योगाची मदत होऊ शकते. ही बाब विचारात घेऊन शासनाने खादी ग्रामोद्योग, विदर्भ विकास महामंडळ व उद्योग विभाग या तीन विभागामार्फत रेशीम उद्योग विकासासाठी करण्यात येणाऱ्या कामांमध्ये एकसूत्रीपणा येण्यासाठी दि. 1 सप्टेंबर 1997 पासून रेशीम संचालनालयाची स्थापना केली आहे. हा स्थापना दिवस सन 2007 पासून राज्यात रेशीम दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, लघू उद्योग विकास महामंडळाचे सहा. व्यवस्थापक डी. जी. सुरवसे, रेशीम संचालनालयाच्या संचालक श्रीमती भाग्यश्री, जालना येथील लघु उद्योग विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता म. अ. त्रिंबके, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

silk day jalna arjun khotkar sericulture रेशीम रेशीम शेती अर्जुन खोतकर जालना रेशीम दिन महा रेशीम अभियान maha reshim abhiyan

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.