
Minister Radhakrishna Vikhe Patil News
अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर तालुक्यातील तीन मंडळाच्या 45 गावांमध्ये शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे, पुलांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पशुधनाचीही हानी झाली आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर, खडकी व वाळकी गावात झालेल्या नुकसानीची जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत उपस्थित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
यावेळी आमदार शिवाजी कर्डीले, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अकोळनेर गावातील वालुंबा नदी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करत झालेल्या नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली.
खडकी गावामध्ये ऋषिकेश निकम यांच्या शेतामधील मोसंबीसह इतर पिकाची, शकुंतला तात्याराम कोठुळे यांच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या सयाजी कोठुळे यांच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत संवाद साधून कुटुंबियांना धीर देत घाबरू नका, शासन तुमच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिली.
वाळकी येथे गावठाणातील पूल परिसरातील तसेच जुंदरे मळा परिसरातील नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थांकडून झालेल्या नुकसानीची माहितीही त्यांनी घेतली.
Share your comments