पुणे : राज्यात दूध प्रकल्पांचे भुकटीचे साठे विक्रमी वाढून थेट ५० हजार टनांवर पोहोचल्याने डेअरी उद्योगाची चिंता वाढली आहे. या साठ्यांमुळेच शेतकऱ्यांना योग्य खरेदी दर देता येत नसल्याचा दावा केला जात आहे.
अतिरिक्त दूध भुकटीची यापूर्वी 2018 मध्ये समस्या तयार झाली होती. तेव्हा दूध दर कोसळून प्रतिलिटर 18 रुपयांपर्यंत गेले होते. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उग्र आंदोलन छेडताच राज्य सरकारने भुकटी निर्यातीला अनुदान जाहीर केले होते.
हेही वाचा : नॅनो युरियामुळे पिकाची नत्राची गरज भागून पिकाची पौष्टिकता व गुणवत्तेमध्ये वाढ होईल : दादाजी भुसे
भुकटीचे विक्रमी साठे
सोनई दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने म्हणाले, की 2018 मध्ये देशात भुकटीचे साठे 1 लाख 80 हजार टनांपर्यंत होते; तर राज्यात रोज 5 हजार टन भुकटी अतिरिक्त तयार होत असे. त्या तुलनेत यंदा मात्र देशात 2 लाख 20 हजार टन साठा आहे. त्यापैकी राज्यात 50 हजार टन भुकटी पडून आहे. हे साठे विक्रमी स्वरूपाचे आहेत. भुकटी निर्यात करणे हाच उपाय स्विकारावा लागेल.
हेही वाचा : केंद्राकडून पंधरा हजार कोटी, होईल पशुसंवर्धनाचा विकास
170 रुपयांपर्यंत दर घसरले
तीन वर्षांपूर्वी भुकटी निर्यातीला अनुदान जाहीर होताच शेतकऱ्यांच्या दूध खरेदीदरात 18 रुपयांवरून 25 रुपयांपर्यंत वाढ झाली होती. सध्या दुधाचे भाव 23 ते 25 रुपये आहेत. भुकटीचे भाव बघता कच्चा माल असलेल्या दुधाचे दर 22 रुपयांपर्यंत परवडतात. ‘‘भुकटीचे दर 170 रुपये किलोपर्यंत आले आहेत. भुकटी प्रकल्पांना तोटा होत असतानाही 2 ते 4 रुपये प्रतिलिटर जादा मोजून खरेदी केले जात आहे. हे केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी होत असले तरी तोटा सहन करण्याला देखील मर्यादा असतात,’’ असेही माने यांनी स्पष्ट केले.
भुकटीसाठी राज्य सरकारने अनुदान योजना सुरू करण्याची मागणी होत असली तरी आधीचा अनुभव वाईट आहे. गोकुळ, सोनई, डायनामिक्स, गोविंद, प्रभात, पराग, पारस, थोरात या आघाडीच्या डेअरी प्रकल्पांनी यापूर्वीच्या भुकटी निर्यात योजनेत भाग घेतला. मात्र या प्रकल्पांना अद्यापही अनुदान दिले गेलेले नाही.
लॉकडाउन ठरला अडथळा
संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या (राजहंस) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 250 ते 270 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेलेले भुकटीचे बाजार हळूहळू घटत आता 190 रुपयांपर्यंत आले आहेत. त्यामुळे भुकटीचे साठे वाढून भांडवलही अडकून पडले आहे. लॉकडाउनमुळे गेल्या दोन हंगामांपासून भुकटीची मागणी घटली. आता निर्यातीशिवाय ही समस्या सुटणार नाही.
Share your comments