जळगाव : राज्यभरात पावसाने जोर धरला असून बहुतेक भागात सोमवार रात्रीपासून संततधार ते जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरातही जोरदार पाऊस पडत आहे. जळगावातील चाळीसगावातही जोरदार पावसामुळे नद्यांना महापूर आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गावाजवळ ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली असून येथे काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला.
यामुळे पाटणा गावाच्या आजुबाजूचा परिसर आणि पाच गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जळगाव आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांना जोडणारा कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर औरंगाबादेतही तुफान पावसाने नद्यांना पूर आला आहे.तीतूर डोंगरी नदीच्या उगमस्थानावरील कोदगाव आणि वलथाण ही धरणे भरली असून जोरदार पावसामुळे नदीला महापूर आला आहे.
अनेक दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेली.
हेही वाचा : मराठवाडा, कोकण, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार, मुंबईतही दमदार पावसाचा इशारा
अनेक घरात पाणी शिरले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पुलावरुन मोठया प्रमाणावर पाणी वाहत असल्याने चाळीसगाव शहरातून औरंगाबादकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. पाटणादेवी परिसरातील पाच गावे पुराच्या पाण्याने वेढली गेली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या गावांमधील वीज पुरवठादेखील खंडीत झाला आहे.
औरंगाबादमध्ये जोरदार पाऊस
औरंगाबादमध्येही जोरदार पाऊस बरसत आहे. भिलदारी पाझर तलाव फुटल्यानंतर नागद परिसरात भीषण पूर आला. पूर आल्यानंतर गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात पुजारी अडकला होता. या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी काढले बाहेर. पूर आल्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता. दरवाजा बंद झाल्यानंतर स्लॅब फोडून पुजाऱ्याला बाहेर काढले. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनीच हे रेस्क्यू ऑपरेशन राबवले.
Share your comments