1. बातम्या

राज्याच्या काही भागांमध्ये आजपासून मुसळधार पावसाची शक्यता

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


राज्याच्या काही भागांमध्ये आजपासून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टी दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग ते उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. यामुळे राज्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अनेक भागात उघडीप दिली आहे. काही भागात पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. त्यामुळे काही अंशी ढगाळ हवामान राहत असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासहह जोरदार पाऊश पडत आहे. विदर्भात पावासाचा जोर कमी असला तरी इतर भागात कमी अधिक स्वरुपात पाऊस पडत आहे. पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार येत्या आठवडय़ात राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवडय़ात पावसाचे प्रमाण कमी असेल, मात्र अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान गुरुवारी मुंबई आणि महानगर परिसरात हलक्या पावसाचा शिडकावा झाला. गुरुवारी दिवसभरात मुंबई शहर आणि उपगनरात पाच मिमीपर्यंत, ठाणे आणि परिसरात पाच ते दहा मिमी, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली परिसरात पाच मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली.

पाऊस सक्रिय असल्याने ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. बुधवार आणि गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि गोव्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. दरम्यान उद्या कोकण आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. तर विदर्भात व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील. १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या आठवडय़ात विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाची हजेरी लागू शकते. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असेल. त्यानंतरच्या आठवडय़ात २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात केवळ कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याजवळच्या जिल्ह्यंमध्ये पाऊस असेल. इतरत्र पाऊस कमी होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसाला पोषक स्थिती असून, येत्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters