राज्यात शेतकऱ्यांवर पावसाचे संकट कायम असल्याचे दिसून येत आहे. आज परत कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. भारताच्या संपुर्ण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात केरळसह कर्नाटकाच्या किनारपट्टीवर पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
तर पुढील २४ तासात कोकण आणि गोव्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याच अंदाज आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रमाणे या भागात वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान राज्यात उन्हाचा चटका कायम असल्याने कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य प्रदेशापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. अशातच समुद्रावरून होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात दुपारपासून ढगांची निर्मिती होत आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मराठवाड्यातील उस्मानाबाद लातूर, नांदेड, विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे.
तर राज्यातही ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला, व मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, मालेगाव, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, चंद्रपूर, येथे तापमान ४० अंशांच्या पुढे असून उर्वरित राज्यात पारा चाळीशी खाली घसरला आहे. कालच्या अहवालानुसार, गुजरात राज्य आणि जम्मू-काश्मीरमधील काही ठिकाणी कमाल तापमान सामान्यपेक्षा (३.१ डिग्री सेल्सियस ते ५.० डिग्री सेल्सियस) तापमानापेक्षा कमी होते.
Share your comments