राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाली आहे. दरम्यान आज परत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह उद्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यची शक्यता आहे. कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना चालना मिळणार आहे. शनिवारपर्यंत दक्षिण बंगालच्या उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर डेरे दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याची माहिती हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात सोमवारी वादळी वारे, विजा, गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. दुपारपासूनच अनेक भागात पावसाळी ढग जमा झाल्याने उन्हाचा चटका काहीसा कमी झाला. तर उत्तर महाराष्ट्रातील तापमानातील वाढ कायम असल्याचे दिसून आले.
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भासापासून तेलगंणा, रायलसीमा, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेडसह पुर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासह देशाच्या इतर राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील २४ तासात केरळ, अंतर्गत तमिळनाडू, दक्षिणी कर्नाटक, बिहारच्या काही भागात, उप हिमालय पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालयात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील २४ तासात पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल मध्ये पावसाची स्थिती होती.
दरम्यान हवामान विभागाने एक आनंदाची बातमी दिली आहे. दक्षिण अंदमान समुद्र सुमात्राच्या किनाऱ्यालगतच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत असून उद्या या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकणार असून शनिवारपर्यंत ही प्रणाली अधिक तीव्र होणार आहे. दिर्घकालीन सर्वसामान्य वेळेनुसार मॉन्सून २० मेपर्यंत अंदमान-निकोबार बेटावर दाखल होत बहुतांश भाग व्यापत असतो. मात्र यावेळी सर्वसाधरण वेळेच्या चार दिवस आधीच मॉन्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी १८ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता.
सोमवारी सकाळपर्यंतचे तापमान
पुणे-४०.५, जळगाव-४३.६, धुळे-४३.०, कोल्हापूर-३५.२, महाबळेश्वर ३४.०, मालेगाव ४४.४, नाशिक ४०.०, निफाड-४०.०, सांगली ३६.४, सोलापूर ३९.६, डहाणू ३४.५, सांताक्रुझ ३४.२, रत्नागिरी ३४.२, औरंगाबाद -४०.०, परभणी-३९.०, नांदेड-३५.५. अकोला-४२.०, अमरावती-४०.४, बुलडाणा -४०.५, बह्मपुरी-३७.५, चंद्रपूर-३७.५, गोंदिया-३७.२, नागपूर-३९.४, वर्धा-४०.०, यवतमाळ-३९.५.
Share your comments