पुर्वमोसमी पावसाच्या हजेरीने राज्याच्या कमाल तापमानात चढ - उतार होत आहे. काल राज्यातील काही विविध भागात जोरदार वारे, विजा, गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आज राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह उन्हाचा चटका, उकाडाही कायम राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून आज सांयकाळपर्यंत या भागात चक्रीवादळाची निर्मिती होणयाचे संकेत आहेत. बुधवारपर्यंत हे वादळ क्षेत्र बंगालच्या उपसागरात सक्रिय राहणार आहे. उद्या १७ आणि १८ मे पर्यंत एक चक्रीय वादळ येण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक राज्यात पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुढील येणाऱ्या २४ तासांमध्ये आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, आणि नागालँडमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जम्मू- काश्मीर मुझफ्फराबाद, गिलगित, बलिस्तान आणि हिमाचल प्रदेशासह पंजाबच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रातही पारा वाढलेला होता. धुळे, मालेगाव, येथे ४३ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी तापमान चाळीशी पार आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिण भागातील जिल्हे आणि कोकणात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Share your comments