1. बातम्या

राज्यात आज आणि उद्या वादळी पावसाची शक्यता


राज्यात गेल्या काही  दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र पावसाला पोषक हवामान असल्याने आज आणि उद्या राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.   उत्तर महाराष्ट्र परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.

आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, तर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, जिल्ह्यात जोरदार वारे, मेघगर्जनेसह  पाऊस पडण्याचा अंदाजज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवारी  सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी  हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तर कोकणात अनेक भागात पावसाने उघडीप दिली होती. राजस्थानपासून बिहारपर्यंत असलेल्या  हवेचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकून पाकिस्तान आणि बिहारपर्यंत विस्तारला आहे. 

दरम्यान बिहार आणि उत्तर प्रदेशात मागील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला आहे. बिहारमध्ये मागील अनेक तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी पावसात वीज कोसळून झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 110 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 32 लोक जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील दोन्ही राज्यात झाली आहे. पाटण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे.  तर गुरुवारी  मॉन्सूनने दिल्ली राज्य व्यापले आहे. राजस्थानचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण भागात मॉन्सून दाखल झाला आहे.   यासह राजस्थानमध्येही दक्षिण - पश्चिम मॉन्सून दाखल झाला असून २७ जिल्ह्यांमध्ये आपला रंग दाखवत आहे. या राज्यातील काही भागात वादळी पाऊस झाला. जैसलमेरमध्ये बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters