अगोदर ऑनलाईन नोंदणीला झालेली गर्दी नंतर बारदान उपलब्ध नसल्याचे कारण देऊन आधारभूत किमतीच्या मका खरेदीला अडथळा आला. त्यातच शासनाने टारगेट पूर्ण झाल्याचे कारण देत पोर्टल बंद करून अचानक मका खरेदी करणे थांबवले आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील नाव नोंदणी केलेल्या हजार शेतकऱ्यांचे मका विक्रीचा प्रश्न उद्भवलेला आहे.
यावर्षी खासगी बाजारात मक्याचे दर प्रचंड प्रमाणात कोसळले होते. याचाही विचार केला तर खाजगी व्यापारी अकराशे ते चौदाशे रुपये दराने मका खरेदी करत आहेत. या भावाचा विचार केला तर तुलनेने शासकीय आधारभूत किंमत योजनेत 1850 रुपये प्रति क्विंटल दराने मका खरेदी होत होता. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांनी दिलेल्या पत्रानुसार 2 नोव्हेंबर पासून ऑनलाइन पद्धतीने मका खरेदी सुरू केली होती.
हेही वाचा :नाशिक जिल्ह्यातील हंगामपूर्व द्राक्षांचे दोनशे हेक्टरच्या आसपास नुकसान
शेतकऱ्यांनी मका विक्रीला सुरुवात होताच नाव नोंदणीसाठी रांगा लावून नोंदणी पूर्ण केली. परंतु अजूनही बरेचसे शेतकरी मका विक्रीच्या प्रतीक्षेत असताना अचानक मका खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांची धाबे दणाणले आहे. जर ही खरेदी सुरू न झाल्यास शेतकऱ्यांना एका क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. येवला तालुक्याचा विचार केला तर येथे सर्वाधिक 1412 शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 600 शेतकऱ्यांना मका खरेदी चे एसएमएस पाठवण्यात आले आहेत. सुमारे 328 शेतकऱ्यांकडून सुमारे 20 हजार क्विंटल मका खरेदी झाली आहे. परंतु अचानक खरेदी बंद झाल्यामुळे आजारावर शेतकऱ्यांचे मका विक्री बाकी असून अचानक कधी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पुन्हा उद्दिष्ट वाढवून मका खरेदी सुरू करण्याची मागणी परिसरात होत आहे. मका खरेदी सुरू न झाल्यास येवला तालुक्यातच कमीतकमी कोट्यवधींचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागेल.
Share your comments