1. बातम्या

शेतकऱ्यांचे कर्जवाटप होण्यासाठी आजपासून भाजपचे राज्यव्यापी आंदोलन

KJ Staff
KJ Staff


शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने भारतीय जनता पक्ष राज्य सरकारवर टीका करत आहे. शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळावे यासाठी भाजप आजपासून आंदोलन करत असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकात पाटील यांनी दिली. पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी आजपासून (22 जून) राज्यात ठिकठिकाणी 'कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,' आंदोलन करेल, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

"राज्यात कोरोनाचे संकट आहे म्हणून पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत. राज्य सरकारच्या 'बांधावर खत आणि बियाणे' या योजनेचा बोजवारा उडालेला आहे. पीककर्जाचे वाटप ठप्प झाले, त्यामुळे भाजपने आंदोलनाचा निर्णय घेतला. राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावी आणि कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी," अशी भाजपची मागणी आहे. पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात ठिकठिकाणी बँकांसमोर निदर्शने करतील. तसेच शेतकऱ्यांच्या सह्या गोळा करुन त्यांचे निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात येईल. या आंदोलनात कोरोनाच्या साथीमुळे योग्य काळजी घेतली जाईल.

राज्यात लाखाच्यावर शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. मजबुरीने व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागत आहे. चणा खराब होण्याची वेळ आली तरी खरेदी होत नाही. खरीप पीककर्ज नाही, कापसाचे, तुरीचे, चण्याचे पैसे आलेले नाही. बियाणे, खत, मजुरी भागवायची कशी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे. दागिने गहाण ठेवून शेतकरी सावकाराकडे विनवणी करतो आहे," असंही पाटील म्हणाले. भाजपने फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आंदोलन केले होते आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. कर्जमाफी कागदावरच आहे आणि पीककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांचा बँकांमध्ये वारंवार अपमान होत आहे, यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters