1. बातम्या

कासारी जांभळी खोऱ्यात रान गव्यांच्या हल्ल्याचे सत्र सुरूच

KJ Staff
KJ Staff

कोल्हापूर  :  ' भय इथले संपत नाही ' अशी परिस्थिती पश्चिम पन्हाळा परिसरातील कासारी आणि जांभळी नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या डोंगर परिसरातील गावांची झाली आहे. पश्चिम घाटमाथ्यावरील सह्याद्रीच्या डोंगररांगा या परिसरात आहेत.  त्यामुळे या परिसरामध्ये रान गव्यांचा प्रचंड वावर आहे.   रान गव्यांचे शेकडो कळप दिवसाढवळ्या जंगल परिक्षेत्र सोडून शेती क्षेत्रात घुसून पिकांचे बारामाही नुकसान तर करत आहेत, शिवाय  शेतकऱ्यांच्या वर जीवघेणे हल्लेही करत आहेत.

पोहाळे/बोरगांव येथील तानाजी ज्ञानु नरके हा युवक शेतात गेला असता रान गव्याने त्याच्यावर पाठलाग करत जबरदस्त हल्ला केला.   या हल्ल्यात तानाजी नरके हा युवक जागीच ठार झाला. पोहाळ्यातील शेतकरी या धक्यातून बाहेर येत न येत तोपर्यंतच शनिवारी देऊळ मेहेर या शेतात भुईमुगाची राखण करण्यासाठी गेलेल्या श्रीमंत शिंदे या शेतकऱ्यावर रान गव्याने हल्ला केला या हल्यात श्रीमंत शिंदे गंभीर जखमी झाले. अवघ्या पाच महिन्यात झालेल्या या घटनामुळे जांभळी कासारी खोरा हादरून गेला आहे.यापूर्वीही मोताईवाडी येथील दोन बळीराजांना  रान गव्याच्या हल्ल्यात प्राणास मुकावे लागले होते.  गेले दशकभर कासारी आणि जांभळी खोऱ्यातील पोहाळे, पोहाळेवाडी, किसरूळ, काळजवडे, पोंबरे, पिसात्री मानवाड, कोलिक, पाटपन्हाळा , काऊरवाडी,आदी गावामध्ये रान गव्यांचा हैदोस सुरू आहे.   सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या परिसरामध्ये शेतीच्या कामाची लगबग सुरू आहे. नाचणी आणि भातलागणीच्या कामाने वेग घेतला आहे. पण वनपरिक्षेत्रात मुबलक चारा असूनही  रान गव्यांनी शेती क्षेत्रात घुसून पिकांची नासधूस सुरू केली आहे.  रान गव्यांचे हे आक्रमण शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरवत आहे.  कधी आणि कुठून गवे येतील आणि हल्ला करतील याचा काही नेम नाही. त्यामुळे शेतात वैरणीसाठी जाणारा शेतकरी असो वा शेतकरी महिला असो, सर्वजण जीव मुठीत धरून शेतात जात असल्याचे चित्र आहे.

गेले दशकभर रान गव्यांचा हा हैदोस वनखाते केवळ पाहत असून पंचनामे करण्याच्या पलीकडे  रान गव्यांचा हैदोस रोखण्यासाठी काही ठोस  उपाय योजना करत नसल्याचे चित्र आहे.  त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गातून वनखाते  तसेच लोकप्रतिनिधी विषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.  एकीकडे कडक असे वन्यजीव कायदे आणि रान गव्यांचा शेती क्षेत्रात होणारा शिरकाव व त्यांच्याकडून शेतकऱ्यावर होणारे जीवघेणे हल्ले अशा कात्रीत या परिसरातील शेतकरी सापडला आहे.   त्यामुळे या प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.   अन्यथा रानगवे बळीराजाचे बळी घेतच राहतील आणि ' नेमिची येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे वनखाते पंचनामा करून नुकसानभरपाई देऊन रान गव्यांकडून होणाऱ्या हल्ल्यावर पडदा टाकत राहील.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters