Shinde Fadnavis Government : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (22 जुलै) त्यांचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डिंग्स लावले आहेत.
राष्ट्रवादीतल्या बंडानंतर अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पद मिळवलं आहे. अशातच अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. पुन्हा राजकीय समीकरणं बदलून मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक ट्वीट केले आहे.
'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' अशा कॅप्शनसह अमोल मिटकरी यांनी एक अजित पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. "आपल्याला जी गोष्ट पटते लगेच त्यासाठी हो म्हणून टाकतो. परंतु कुणीही उठून सांगितली की माफी मागा. तर माफी मागायला मोकार नाही," असे अजित पवार यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
अजित पवार भावी मुख्यमंत्री - संजय राऊत
अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील, असे खासदार संजय राऊत यांनीही म्हटलं आहे. "अजित पवार भावी आहेत म्हणजे ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. काय घडामोडी घडत आहेत ते मलाही माहिती आहे. मग त्या घडामोडी कायदेशीर असतील, घटनात्मक असतील अथवा राजकीय असतील.
परंतु अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर-लवकर जवळ येत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. मी याआधीही सांगितलं आहे की, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल," असे संजय राऊत म्हणाले होते.
Share your comments