1. बातम्या

भवरलालजी जैन यांना मरणोत्तर लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार

KJ Staff
KJ Staff


जळगाव:
केळी पिकाच्या क्षेत्रात देशात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना आजपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय केळी परिषदेत 'जीवन साधना गौरव 2020’ हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. जैन इरिगेशनच्यावतीने हा पुरस्कार जैन इरिगेशनचे सहकारी के. बी. पाटील (टिश्युकल्चर मार्केटींग हेड), डॉ. अनिल पाटील (टिश्युकल्चर प्रॉडक्शन हेड), डॉ. ए. के. सिंग (टिश्युकल्चर आर एण्ड डी हेड) आणि डॉ. एस. नारायण (एक्सटेन्शन हेड) यांनी स्वीकारला.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे फलोद्यान विभागाचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग, परिषदेचे कृषि अभियांत्रिकी विभागाचे उप महासंचालक डॉ. के. अलगुसुंदरम, तामीळनाडू कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. कुमार, बायोर्व्हसिटी इंटरनॅशनलचे आशियायी देशांचे संचालक डॉ. एन. के. कृष्णकुमार, यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि चंदनाच्या हाराचा समावेश आहे. पुरस्कार प्रदान समारंभाला पोस्टमास्टर जनरल श्रीमती सुमती रविचंद्रन, कृषि संंशोधन परिषद सहाय्यक महासंचालक डॉ. डब्ल्यु. एस. धिल्लन, त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. एस. उमा व इतर मान्यवर उपस्थित होते.

“डॉ. भवरलाल जैन यांनी केळी उत्पादन, प्रक्रिया व करार शेतीच्या क्षेत्रात चाळीस वर्षात जे उल्लेखनीय काम केले त्यामुळेच भारत देश केळीच्या उत्पादनात आज जगात प्रथम क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.” या शब्दात भवरलालजींच्या कार्याचा गौरव करून पुरस्कार प्रदान प्रसंगी डॉ. ए. के. सिंग म्हणाले, जैन इरिगेशन कंपनीने 1994-95 पासून टिश्युकल्चर पद्धतीने ग्रॅण्डनाईन या जातीच्या केळी रोपांची व्यापारी तत्त्वावर शास्त्रशुद्ध पद्धतीने रोपे बनवून ती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. कंपनी आता दर वर्षी केळीची सुमारे 10 कोटी रोपे बनवित असून ती पूर्णपणे रोगमुक्त व व्हायरस मुक्त आहेत. नुसती रोपे बनवून कंपनी थांबली नाही तिने केळी उत्पादनाचा शास्त्रशुद्ध कार्यक्रम व पूर्ण वेळापत्रक आणि तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे उत्पादनाचा विक्रम प्रस्थापित होऊन शेतकऱ्यांना मोठी आर्थिक समृद्धी प्राप्त झाली आहे. कंपनीने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानामुळे देशातून केळी निर्यातीला प्रारंभ होऊन गत वर्षी देशातून चार हजार कंटेनर निर्यात होऊ शकले.

जैन इरिगेशन कंपनी बनवित असलेली टिश्युकल्चर केळी ही दरवर्षी एक लाख रोपे लावणाऱ्या तांदलवाडी (रावेर, जळगाव) येथील प्रगतशिल शेतकरी प्रशांत वसंत महाजन यांना 'उत्कृष्ठ केळी उत्पादक' हा पुरस्कार मिळाला. डॉ. ए. के. सिंग यांच्या हस्ते प्रशांत महाजन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारात प्रमाणपत्र सन्मानचिन्हं, शाल व हार याचा समावेश होता. प्रशांत महाजन हे गेल्या 18 वर्षांपासून आधुनिक तंत्राचा वापर करून केळीची शेती करीत असून त्यानी एकरी 46 टन केळीचे उत्पादन काढले आहे. जैन कंपनीने विकसित केलेल्या ऑटोमेशन, फर्टिगेशन, फ्रुटकेअर, गादीवाफा व मल्चिंग, काढणीपूर्व व काढणीपश्चात हाताळणी तंत्रज्ञान याचा ते पद्धतशीर वापर करीत आहेत. महाराष्ट्रातील पहिल्या अत्याधुनिक पॅक हाऊसची निर्मिती करून गत वर्षी 240 कंटेनर त्यांनी निर्यात केले आहेत.

तामिळनाडू कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. एम. सी. रेड्डी, ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅण्ड युनिर्व्हसिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील प्रा. डॉ. जेम्स डेल, बेल्जियम येथील बनाना जेनिटीक रिसोर्स स्पेशॅलिस्ट डॉ. रॉनी श्वेनन, द. आफ्रिकेतील प्लॅन्ट पॅथॉलॉजिस्ट डॉ. अल्तस व्हीलजॉन, डॉ. निकोलस रॉक्स, या शास्त्रज्ञांबरोबरच राजेश दत्ता (त्रिपुरा), अमितकुमार सिंग (बिहार), यांच्यासह दहा शेतकऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

आजपासून तिरुचिरापल्ली येथे सुरू झालेली आंतरराष्ट्रीय केळी परिषद 25 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. परिषदेला भारतासह 14 देशांतील 600 प्रतिनिधी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातून या केळी परिषदेला जळगावचे प्रेमानंद हरी महाजन, प्रवीण गंभीर महाजन, विशाल अग्रवाल, ऋषि महाजन, विशाल महाजन, पुष्कराज चौधरी, कृषि विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे, केळी संशोधन केंद्र जळगावचे डॉ. एन. बी. शेख, मध्यप्रदेशातील संतोष लचेटा व इतर प्रगतशिल शेतकरी व अधिकारी उपस्थित आहेत.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters