कृषी उत्पादक कंपन्याबाबत सर्वसामावेशक व व्यापक शेतकरी हिताचे धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री फार्मर्स कंपनी येथे आयोजित कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधीनी चर्चेत सहभाग घेतला.
कृषी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून राज्यभरात अतिशय चांगले काम सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, सह्याद्री फार्मर्स कंपनीसारख्या शेतकऱ्यांना एकत्रित करून काम करणाऱ्या कंपन्यांना बळ देण्यासोबतच या कंपन्यांच्या सहकार्याने सर्वसामावेशक शेतकरी हिताचे धोरण राज्य शासन लवकरच तयार करणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठेचा दर्जा देण्याबाबत विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.
संबंधित बातमी वाचण्यासाठी: कौशल्य विकासाद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण
ते म्हणाले, द्राक्ष निर्यातदाराकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. देशात वाणांच्या नवीन प्रजाती आल्या तर बाजारपेठ मिळणे सुलभ होणार आहे, त्यादृष्टीने शासन आणि शेतकरी यांना एकत्रित काम करावे लागणार आहे. सौर उर्जेचा वापर वाढविण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगून राळेगणसिद्धी येथे सौर ऊर्जेवरील पहिला पथदर्शी प्रकल्प उभा केला आहे, राज्यात याच धर्तीवर सौरप्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Share your comments