गतवर्षी सुरु झालेली संकटांची मालिका या नूतन वर्षात देखील शेतकऱ्यांचा पाठलाग करत आहे. काल म्हणजेच शनिवारी नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघराजा गर्दी करत होता, येवला तालुक्यात देखील ढगाळ वातावरण तयार झाल्याने बळीराजा चिंताग्रस्त स्थितीत सापडला आहे. गत वर्षी पावसाच्या लहरीपणाचा प्रत्यय बळीराजाला आला असल्याने, तालुक्यात पावसाचे वातावरण नजरेस पडतात बळीराजा पुरता हताश झाला आहे. खरीप हंगामा प्रमाणेच रब्बी हंगामात देखील कधी अवकाळी कधी दाट धुके कधी ढगाळ वातावरण यामुळे रोगांचे सावट बरकरार असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.
या दूषित वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांवर माव्याचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. रब्बी हंगामातील रांगड्या कांद्यावर ढगाळ वातावरण व दाट धुक्यामुळे प्रतिकूल परिणाम होत असून रांगड्या कांद्याची पात पिवळसर होत आहे. तसेच यामुळे परिसरातील उन्हाळी कांदा लागवड देखील प्रभावित झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी मोठा आटापिटा करून महागड्या औषधांची फवारणी करताना दिसत आहे. येवला तालुक्यात मध्यंतरी झालेल्या अवकाळी मुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी कांद्याच्या रोपवाटिका संपूर्ण मातीमोल झाल्या होत्या, परिणामी शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांदा लागवड करण्यासाठी रोपच शिल्लक नव्हती, म्हणून परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चढ्या दरात उन्हाळी कांद्याच्या रोपांची खरेदी करून पुन्हा एकदा नव्या जोमात उन्हाळी कांदा लागवड सुरू केली आहे. मात्र असे असतानाच तालुक्यात तयार झालेले ढगाळ वातावरण नुकतेच लावल्या गेलेल्या कांद्याला घातक असल्याचे सांगितले जात आहे.
तालुक्यात कायम बनलेले दाट धुके व ढगाळ वातावरनामुळे कांद्याचे शेंडे पिवळसर पडत आहेत, त्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर महागड्या औषधांची फवारणी करण्याची नामुष्की ओढवून आली आहे, आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ नमूद करण्यात येत आहे. तालुक्यात सर्वत्र लाल कांदा काढणीला प्रारंभ झाला आहे, अनेक शेतकऱ्यांचा लाल कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल देखील झाला आहे, आणि अशातच अवकाळी नामक ग्रहण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. ढगाळ वातावरणाचा फटका फक्त रब्बी हंगामातील पिकांनाच बसत आहे असे नाही, यामुळे द्राक्षाच्या बागा देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित चित्र नजरेस पडले आहे.
आगामी काही दिवसात परिसरातील द्राक्ष बागा काढणीसाठी तयार होणार आहेत, आणि अशातच हे अवकाळी नामक सावट द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे त्रासदायक सिद्ध होऊ शकते. परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च करून द्राक्षाच्या बागा जोपासल्या आहेत, सुरुवातीपासूनच या हंगामात निसर्गाची अवकृपा कायम असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात नेहमीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तसेच या ढगाळ वातावरणातून द्राक्षबागा वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करताना दिसत आहेत.
Share your comments