1. बातम्या

शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करावा

मुंबई: राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बँकांनी अंमलबजावणी करणे अपेक्ष‍ित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिले. दरम्यान, यावेळी राज्याच्या 4 लाख 24 हजार 29 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बँकांनी अंमलबजावणी करणे अपेक्ष‍ित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिले. दरम्यान, यावेळी राज्याच्या 4 लाख 24 हजार 29 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस कृषीमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सन 2019-20 साठीच्या मंजूर केलेल्या 4 लाख 24 हजार 29 कोटी रुपयांच्या एकूण वार्षिक पतपुरवठा आराखड्यात कृषी क्षेत्रासाठी 87 हजार 322 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

गेल्या वर्षीच्या पिक कर्जाच्या उद्द‍िष्टपूर्तीची आकडेवारी पाहून मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकूण उद्द‍िष्टाच्या केवळ 54 टक्केच साध्य झाले ही गंभीर बाब असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, केवळ सादरीकरणासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक नाही. या बैठकीत जे निर्णय घेतले जातात ते बँकांनी त्यांच्या क्षेत्रीय स्तरावरील शाखांपर्यंत पोहोचविले पाहिजे. बँकांनी शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवावी. उद्द‍िष्टपूर्तीसाठी जबाबदारी निश्चित करावी. बँकांच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी जेणेकरून शेतकऱ्यांना पिक कर्ज घेताना अडचणी येणार नाहीत.

शाश्वत शेतीसाठी कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. बँकांचे पिक कर्जाचे उद्द‍िष्ट आणि साध्य यात तफावत असू नये. शेतकऱ्यांप्रती असणारी भावना बँकांनी बदलणे गरजेचे आहे असे स्पष्ट करतानाच जास्तीत जास्त पिक कर्जाचे वाटप झाले पाहिजे. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती ग्रामीण भागातील बँकांच्या शाखांपर्यंत पोहोचावी यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या मुद्रा बँक, प्रधानमंत्री जनधन योजना, स्टॅण्ड अप इंडिया, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना यासारख्या योजनांमधील पत पुरवठ्याची कामगिरीदेखील सुधारली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कृषीमंत्री श्री. पाटील म्हणाले, क्षेत्रीय स्तरावर होणाऱ्या बैठकांना बँकांनी वरिष्ठ अधिकारी पाठवून आहे त्याच ठिकाणी अडचणींवर मार्ग काढावेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा स्थानिक स्तरावरच झाला तर त्यांना दिलासा मिळेल. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवितानाच जून-जुलै महिन्यात अतिरिक्त कर्मचारी नेमून पिक कर्ज वेळेवर मिळण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले. बैठकीस राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विविध राष्ट्रीयकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

English Summary: Banks should make finance by showing sensitivity towards agriculture and farmers Published on: 31 May 2019, 07:59 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters