1. बातम्या

फेब्रुवारी अखेर देशातील साखर उत्पादन 246 लाख टन

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
फेब्रुवारी महिना अखेर देशातील साखर उत्पादन जवळपास 246 लाख टन झाले असून हंगाम अखेर ते 315 लाख टनापर्यंत होण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार श्री. दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. यामध्ये महाराष्ट्राने 91 लाख टन साखरेचे उत्पादन करून आघाडी घेतली असून हंगाम अखेर 97 ते 100 लाख टन साखर उत्पादन होण्याचे अनुमान आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशाचे साखर उत्पादन 73 लाख टन झाले असून हंगाम अखेर ते 115 लाख टन होण्याचा अंदाज आहे.

यंदाचे वैशिष्ट्य असे आहे की महाराष्ट्रातील 181 साखर कारखान्यांनी 827 लाख टन ऊस गाळप करून साखरेचा सरासरी उतारा 11 टक्के नोंदला आहे. त्यातुलनेत उत्तर प्रदेशातील 117 कारखान्यांनी 655 लाख टन ऊस गाळप करून सरासरी 11.10 टक्के साखर उतारा मिळवून साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्रापेक्षा जास्तीचा साखर उतारा मिळविला. यात सिंहाचा वाटा हा "को 238" या वाणाच्या लागवडीचा आहे. 

देश पातळीवर तृतीय स्थानावर असलेल्या कर्नाटकातील 45 कारखान्यांनी फेब्रुवारी अखेर 400 लाख टन उसाचे गाळप करून सरासरी 10.50 टक्के साखर उताऱ्याने 42 लाख टनचे नवे साखर उत्पादन केले आहे. त्यानंतर गुजरात (9 लाख टन), बिहार (5.70 लाख टन), पंजाब (4.50 लाख टन) व हरियाणा (4.30 लाख टन) अशी क्रमवारी दिसत आहे. 

तामिळनाडूत मात्र गेल्या पाच वर्षातील सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे फक्त 48 लाख टन ऊस गाळप व सरासरी 9 टक्के साखर उताऱ्याने 4.30 लाख टन इतकेच नवे साखर उत्पादन फेब्रुवारी अखेर झाले. या राज्याचे हंगाम अखेर होणारे 8 लाख टन साखरेचे उत्पादन लक्षात घेता महाराष्ट्रासारख्या शेजारी राज्यांना तामिळनाडूतील साखरेची बाजारपेठ उपलब्ध आहे. तसेच ऊसाची कमतरता कच्ची साखर पुरवठ्याने भरून काढण्याचे तामिळनाडूचे प्रयत्न असून त्यात देखील महाराष्ट्रातील कारखान्यांना सहभागी होता येईल असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले. 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters