1. बातम्या

राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांना कार्यक्षमता पारितोषिके जाहीर

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली यांच्या तर्फे देशातील सहकारी साखर कारखान्यांना त्यांच्या उतकृष्ट कामगिरी बद्दलची यंदाची पारितोषिके जाहीर झाली आहेत. एकूण 21 पुरस्कारांपैकी 10 पुरस्कार पटकावून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला असून त्या पाठोपाठ उत्तरप्रदेशने 4 पुरस्कार मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. हरियाणा, गुजरात व तामिळनाडू या राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी प्रत्येकी 2 पुरस्कार मिळवले असून मध्यप्रदेशने 1 पुरस्कार पटकावून या वार्षिक पुरस्कार स्पर्धेत प्रथमच प्रवेश मिळवला आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ ही देशभरातील सर्व 262 सहकारी साखर कारखाने व 9 राज्य सहकारी साखर संघाची शिखर संस्था असून देशाच्या साखर, ऊस, इथेनॉल व तत्सम उप-पदार्थांबाबतच्या ध्येय-धोरणांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी असते. तसेच सभासद कारखान्यांना मार्गदर्शन, तांत्रिक सल्ला देणे त्याचप्रमाणे त्यांचे दिल्ली स्तरावरील संबंधित मंत्रालये व पंतप्रधान कार्यालय या ठिकाणी प्रतिनिधित्व करणे या महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळते.

या महासंघातर्फे सन 1985 पासून दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस विकास; तांत्रिक क्षमता व आर्थिक व्यवस्थापन या क्षेत्रातील कामगिरीचे विश्लेषण करण्यात येते व केंद्र शासनाच्या प्रमुख संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीव्दारे गुणांक देऊन विजेते निश्चित करण्यात येतात. यंदाच्या पुरस्कार योजनेत विक्रमी 99 सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला होता. त्यांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली. सरासरी किमान 10 टके साखर उतारा असणारे महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात यांचा एक गट व पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू या 10 टक्यापेक्षा कमी साखर उतारा असणाऱ्या राज्यांचा दुसरा गट तयार करून प्रत्येक गटातील विषयवार सर्वाधिक गुण मिळवलेल्या कारखान्यांना पारितोषिकांसाठी पात्र ठरवण्यात आले. 

या व्यतिरिक्त सर्वाधिक ऊस गाळप, सर्वाधिक साखर उतारा व सर्वाधिक साखर निर्यातीसाठी देखील विजेते निश्चित करण्यात आले. या सर्वावर आधारित सर्वाधिक गुण मिळविलेला देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखान्यांचे कै. वसंतदादा पाटील यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे यंदाचे मानकरी ठरले आहेत श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल, कोल्हापूर.  

इतर पुरस्कार विजेत्यांची माहिती खालीलप्रमाणे

   विषय

उच साखर उतारा गट

निम्न साखर उतारा गट  

ऊस विकास

प्रथम पारितोषिक: श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ, कोल्हापूर.
द्वितीय पारितोषिक: पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना, सांगली.

प्रथम पारितोषिक: गंगा किसान सहकारी चीनी मिल, मोरणा, उत्तरप्रदेश.
द्वितीय पारितोषिक: नवलसिंह सहकारी शक्कर कारखाना,  बुऱ्हानपूर, मध्यप्रदेश.

तांत्रिक कार्यक्षमता

प्रथम पारितोषिक: श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, जुन्नर, पुणे.
द्वितीय पारितोषिक: श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर, सोलापूर.

प्रथम पारितोषिक: किसान सहकारी चीनी मिल, सथिऑन, उत्तरप्रदेश.
द्वितीय पारितोषिक: कैथल कोऑपरेटिव्ह शुगर मिल, कैथल, हरियाणा.

आर्थिक व्यस्थापन

प्रथम पारितोषिक: विलास सहकारी साखर कारखाना, लातूर.
द्वितीय पारितोषिक: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर, अहमदनगर.

प्रथम पारितोषिक: सुब्रमण्य कोऑपरेटिव्ह शुगर मिल, धर्मपुरी, तामिळनाडू.  
द्वितीय पारितोषिक: कल्लाकुरीची कोऑपरेटिव्ह शुगर मिल, विल्लूपुरम, तामिळनाडू. 

सर्वाधिक ऊस गाळप

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, हुपरी, कोल्हापूर.

शहाबाद कोऑपरेटिव्ह शुगर मिल, हरियाणा.

सर्वाधिक साखर उतारा

सदाशिवराव मंडलीक कागल तालुका सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर.

किसान सहकारी चीनी मिल, पोवायन, उत्तरप्रदेश.  

सर्वाधिक साखर निर्यात

प्रथम: श्री नर्मदा खांड उद्योग सहकारी मंडळी, गुजरात. 
द्वितीय: कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, इंदापूर, पुणे.

उतकृष्ट सहकारी साखर कारखाना

सहकारी खांड उद्योग मंडळी, गणदेवी, गुजरात.

किसान सहकारी चीनी मिल, स्नेहरोड, नजिबाबाद, उत्तरप्रदेश.

भारतातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना कै. वसंतदादा पाटील पुरस्कार

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल, कोल्हापूर.


यंदाच्या वर्षीचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील एन.सी.यू.आय. सभागृहात संपन्न होणार असून त्यास खासदार श्री. शरद पवार, मंत्री श्री. नितीन गडकरी, श्री. रामविलास पासवान व श्री. रावसाहेब दानवे उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters