मुंबई: राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. मीठ उपलब्ध होत नसल्याबाबतच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत, असे प्रशासनामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
मीठाचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या एका कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात मुंबईमध्ये प्रतिदिन सुमारे २९.९ मेट्रीक टन इतका मीठाचा पुरवठा करण्यात आला आहे. मागील ५ दिवसात सुमारे १४७ मेट्रीक टन इतका मीठाचा पुरवठा करण्यात आला आहे. या कंपनीमार्फत मुंबईमध्ये ६५ मेट्रीक टन इतका मीठाचा पुरवठा करण्यात आला असून दररोजच्या सरासरीपेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. शिवाय या कंपनीकडे १ हजार मेट्रीक टन इतका शिल्लक साठा उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली. शिवाय ही माहिती एकाच कंपनीची असून राज्यात मीठाच्या इतरही कंपन्यांमार्फत आवश्यक पुरवठा सुरु आहे.
जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यासंदर्भात संबंधित विविध विभागांचे सचिव हे सातत्याने वितरक, पुरवठादार, मोठे दुकानदार यांच्याशी संपर्क साधून आहेत. राज्यात सध्या कोणतीही टंचाई नसून पुढील दिवसांतही जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Share your comments