अमरावती: कापूस खरेदीला वेग देण्यासाठी ८ खरेदी केंद्रांवरील जीनची संख्या १८ वरून २५ पर्यंत वाढली असून त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाला जिल्हा प्रशासनाकडून पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला वेग येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेऊन कापूस खरेदी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्या दूर करण्यासाठी व कापूस खरेदीला गती देण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळोवेळी बैठका घेऊन निर्देश दिले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. त्यानुसार काही जीन सुरु झाल्यास खरेदीला गती मिळेल. मात्र, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. त्यात असे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची संकल्पना पुढे आली.
त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १० कृषी पर्यवेक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या. या सर्व पर्यवेक्षकांना ग्रेडिंगबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पणन महासंघाला हे प्रशिक्षित मनुष्यबळ प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले. मागच्या आठवड्यापासून त्यांना फिल्डवर नेमण्यात आले आहे. त्यामुळे सात आणखी जीन सुरु होऊ शकल्या. पूर्वीची १८ जीनची संख्या आता २५ वर गेली आहे. त्यामुळे कापूस खरेदीला वेग येत आहे. आतापर्यंत २२ हजार २०४ शेतकऱ्यांची सुमारे सव्वासहा लाख क्विंटल कापूस खरेदी झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली.
कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची खरेदी त्याच दिवशी पूर्ण व्हावी. गाड्यांची मर्यादा वाढवावी. वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तयार गाठींच्या संकलनासाठी गोदामांची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. कापूस खरेदी १५ जूनपूर्वी पूर्ण झाली पाहिजे. या दृष्टीने प्रयत्न करावा. नियोजनानुसार खरेदी झाली पाहिजे. त्यादृष्टीने सीसीआय, पणन महासंघ यांनी प्रयत्न करावे. कोरोना संकटकाळ लक्षात घेता अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मात्र, त्याशिवाय ही कामे पूर्णत्वास जाऊ शकणार नाहीत, हे लक्षात ठेवून काम करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात एकूण आठ कापूस खरेदी केंद्रे आहेत. त्यातील एक सीसीएचे असून, ते धामणगाव रेल्वे आहे. उर्वरित केंद्रे सात पणन महासंघाची आहेत. कापसाचा हमीभाव ५ हजार ५०० रूपये आहे. कापूस खरेदी प्रक्रियेत सोशल डिस्टन्स, मास्क आदी दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. मात्र, दक्षता पाळताना कामाचा वेगही कायम ठेवावा लागेल. सर्वांची सुरक्षितता जपून प्रत्येक कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. कुठल्याही अडचणी आल्या तर तत्काळ निदर्शनास आणून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी नियोजनपूर्वक कामे करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.
Share your comments