
Ashadhi Yatra News
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री प्रतापसरनाईक म्हणाले, यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केली आहे.
आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी पंढरपुरात येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.
तसेच बस चालकांना व वाहकांना कोणाची राहण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून द्यावे. बस स्थानकातून बस प्रवाशांना घेऊन जाण्याअगोदर बसची देखभाल दुरुस्ती करावी. एसटी बसच्या तात्काळ दुरुस्तीसाठी ज्यादा तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी केल्या.
भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.
तसेच यात्रा काळात पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा – नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली. गतवर्षी वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ५००० विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्राकाळामध्ये सुमारे २१ लाख, भाविक – प्रवाशांची सुखरूप ने-आन एसटीने केली होती अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
Share your comments