पुणे
पुणे जिल्ह्यातील मंजर बाजार समितीत कांदा दरात ५० टक्क्यांनी घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढणार अशा बातम्या येत होत्या. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती. पण साठवणूक केलेला कांदा एकाच वेळी बाजारात आल्याने आवक वाढल्याने दर चांगलेच घसरले आहेत.
बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने जवळपास ५० टक्क्यांनी दरात घसरण झाली आहे. शनिवारी मंचर बाजार समितीत ४२ हजार पिशव्यांची आवक झाली. मालाची जास्त आवक झाल्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा दर ३० ते ३२ रुपये प्रतिकिलो होतो तो १७ ते २२ रुपयांपर्यंत आला. भावात घसरणीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वांत जास्त कांद्याचे उत्पादन घेतले जाते. तर लासलगाव बाजार समितीत कांदा व्यवहार सगळ्यात मोठी आहे. मात्र या ठिकाणी कांद्याचे दर स्थिर आहेत. या ठिकाणी कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी दर २ हजार २५० रुपये मिळत आहे.
दरम्यान, राज्य सरकारने मार्चमध्ये जाहीर केलेले ३५० रुपये अनुदान अद्यापही कांदा उत्पादकांना मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी त्या प्रतिक्षेत आहेत. यासंदर्भात बोलताना पणन मंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांना अनुदान १५ ऑगस्टपर्यंत मिळेल, असे सांगितले होते. पण हे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही.
Share your comments