बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एकट्या बीड जिल्ह्यात या चालू हंगामात पाचशे एकरावरील पाऊस शॉर्टसर्किटमुळे फडातच जळून खाक झाला. मात्र, असे असताना देखील थकबाकी वसूल करण्यासाठी नियमावर बोट ठेवणारे महावितरण कारवाई करण्याच्या भानात नाही.
एवढेच नाही, 500 एकर क्षेत्रावरील उस फडात जळून खाक झाले असतानाही महावितरणने अजुनही लोंबलेल्या तारा ताणलेल्या नाहीत. मग वसुली करण्यासाठी ज्या पद्धतीने दक्ष असतात त्याच पद्धतीने काम करतानादेखील दक्षता बाळगणे अनिवार्य असल्याचा सल्ला आता महावितरणास दिला जात आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी उसाच्या फडात अग्नितांडव बघायला मिळाला. आता, पुन्हा एकदा जिल्ह्यात उसाच्या फडात आग लागल्याची घटना समोर आली आहे. माजलगाव तालुक्याच्या लोणगाव शिवारात आता आग लागल्याचे उघडकीस आले आहे. लोणगाव शिवारात लागलेल्या आगीत सुमारे पाच एकर ऊस जळून खाक झाल्याचे सांगितले गेले आहे. सध्या मराठवाड्यासमवेतच संपूर्ण राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आधीच उस गाळप होण्यास उशीर होतं असल्याने उसाच्या वजनात घट होत आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत असतानाच शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य झाले आहे. एकंदरीत आगीच्या भक्षस्थानी गेलेल्या उसामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या हंगामात उत्पन्नचं प्राप्त झालेले नाही.
विशेष म्हणजे आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेल्या उसाचे महावितरण लगेचच पंचनामे करते. यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांचा ताफा उसाच्या फडात दाखल होतो मात्र पंचनामे केल्यानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी केलेल्या उसाच्या मोबदल्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक छदाम देखील मारून फेकला जात नाही मग महावितरण पंचनामे फक्त देखावा साठी करते की काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Share your comments