मागील वर्षीपेक्षा यंदा साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. ब्राझील देशानंतर भारत हा सर्वाधिक साखर उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा भारताने साखर उत्पादनात ब्राझीललादेखील मागे टाकले आहे. भारत देशाने आता साखर उत्पादनात पहिला क्रमांक पटकवला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशला पीछाडीवर टाकत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्राने 2021-22 मध्ये 137.28 लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. जो मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 31 लाख टन अधिक आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राज्याने यावर्षी 1,320.31 लाख टन उसाचे गाळप करण्याचा आणखी एक विक्रम मोडला आहे, असेही ते म्हणाले. याबाबत माहिती देताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, "राज्यात यावर्षी १३७.२८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत ३०.८८ लाख टन अधिक आहे. त्यामुळे आता राज्यातील गाळप हंगाम संपला आहे," यावर्षी महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन इतके आहे की उत्पादनाच्या बाबतीत ब्राझीलच्या खालोखाल आहे, असे ते म्हणाले.
"उच्चांकी ऊस उत्पादनानंतर यंदा महाराष्ट्राचा गाळप हंगाम जास्त काळ चालला. पूर्वी सुमारे ९०-१२० दिवसांचा ऊस गाळप हंगाम यावर्षी राज्याच्या काही भागात २४० दिवसांवर गेला. सरासरी गाळप हंगाम 173 दिवसांवर गेला, जो मागील वर्षी 140 दिवसांचा होता,” असेही त्यांनी संगीतले. यंदा राज्यभरात सुमारे 200 साखर कारखानदार उसाचे गाळप करत होते. दररोज 8 लाख टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्यांनी यावर्षी 1,320.31 लाख टन उसाचे गाळप केले.
गेल्या वर्षी हा आकडा 1,013.64 लाख टन होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कारखान्यांनी सुमारे 306.67 लाख टन अधिक उसाचे गाळप असल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगितले. गेल्या वर्षी (2020-21) राज्यात एकूण साखर उत्पादन 106.40 लाख टन होते. मागील वर्षीच्या 190 च्या तुलनेत यावर्षी नऊ अतिरिक्त साखर कारखान्यांचा (एकूण 199) प्रक्रियेत सहभाग होता, असे उच्च अधिकार्यांनी सांगितले. कोल्हापूर ३०.०४, पुणे २९.१२, सोलापूर २८.४३, अहमदनगर २०.०७, औरंगाबाद १२.९२, नांदेड १५.३२, अमरावती ०.९६, नागपूर ०.३८ हे राज्याचे यंदाचे क्षेत्रनिहाय साखरेचे उत्पादन (लाख टनांमध्ये).
महत्वाच्या बातम्या:
पावसा आता तरी पड रे! पावसाअभावी तब्बल २७ लाख हेक्टरमध्ये पेरणी थबकली
ऐकावं ते नवलंच; पत्नीला साप चावला तर पती सापाला घेऊन हॉस्पिटलमध्ये,डॉक्टरही चक्रावले
Share your comments