1. फलोत्पादन

आधुनिक तंत्राने वाढवा केळी पिकाची गुणवत्ता

KJ Staff
KJ Staff


भारतामध्ये आंब्यानंतर केळीच्या लागवडीचा दुसरा क्रमांक असून केळीची लागवड बाराही महिने करतात. केळी उत्‍पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्‍या दृष्‍टीने महाराष्‍ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्‍यापारी दृष्‍टीने किंवा परप्रांतात विक्रीच्‍या दृष्‍टीने होणाऱ्या उत्‍पादनात महाराष्‍ट्राचा पहिला उत्‍पादनापैकी सुमारे 50 टक्‍के उत्‍पादन महाराष्‍ट्रात होते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण 44 हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली असून त्‍यापैकी निम्‍म्‍यापेक्षा अधिक क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे. म्‍हणून जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार मानले जाते.

केळीच्या शेतीमध्ये लागवडीपासून ते तोडणी पर्यंत निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. या निरनिराळ्या पद्धतींवर केळी पिकाची गुणवत्ता निर्भर असते आणि या पद्धती योग्यरीतीने अंमलात आणल्यास शेतकऱ्याला गुणवत्तापूर्ण व भरघोस उत्पादन मिळू शकते. या सर्व बाबी लक्षात घेता, शेतकरी बांधवांना या खास पध्दतीविषयी माहिती असणे खुप गरजेचे आहे. या पद्धती खालीलप्रमाणे आहेत.

अ. क्र. छायाचित्र वर्णन 
1   

पिले काढणे:
नवीन रोपाची लागवड केल्यानंतर 2-3 महिन्यांमध्ये पिल येण्यास सुरुवात होते. पिल म्हणजे केळीच्या मातृवृक्षाच्या भोवताली छोटी-छोटी उगवलेली नवीन रोपटे होत. हि नवीन रोपटे ( पिल ) सतत काढावी लागतात. त्यामुळे अन्नद्रव्याचे पोषण मुख्य झाडास पूर्णपणे मिळते व फळाची गुणवत्ता आणि उत्पादन चांगले मिळते. पिल काढणे साधारणता 45 ते 50 दिवसांमध्ये एका वेळेस करावे. त्या पिल चा आपण झाडाभोवती आच्छादन म्हणून वापर करू शकतो. आणि 1 ते 3 पिल चांगलेनिरोगी राखून ठेवावे, जेणेकरून त्यांचा उपयोग पुढच्या वर्षी मातृवृक्षाचा उपयोग करता येईल.

2             

मातृवृक्षाला भर देणे:
सुरुवातीच्या 3-4 महिन्यानंतरच्या कालावधीत झाडांना भर देणे अतिशय महत्वाचे असते. या पद्धतीमध्ये झाडांना आधार देण्यासाठी सरीमधील माती वापरावी. वापरण्यात येणारी माती आंतर मशागतीने भुसभुशीत केलेली असावी. जेणेकरून भर देण्यास सोपे जाईल व जमिनीमध्ये हवा खेळती राहील. या पद्धतीमुळे झाडांची जमिनीमध्ये घट्ट धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि वारा- वादळापासून संरक्षण मिळते.

3    झाडांची पाने काढणे:
या पद्धतीचा अवलंब बागेच्या आवश्यकतेनुसार करावा. या पद्धतीमध्ये झाडांची वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. योग्य वाढ होण्यासाठी आणि उत्पादनासाठी एका जीवनचक्रामध्ये एका झाडाला 10 ते 15 ने असणे आवश्यक असते.  
4   

फुल तोडणी:
ही पद्धत शक्यतो शेतकरी करत नाहीत. या पद्धतीमध्ये झाडांना घड टाकल्यानंतर प्रत्येक केल्याचा टोकाला असलेली फुले कडून टाकावीत. फुलांची घड झाल्यानंतर काढल्यास फळांना इजा होण्याची आणि गुणवत्ता खालावण्याची शक्यता जास्त असते.

5   

झाडाला आधार देणे:
विविध पद्धतीमध्ये झाडांना आधार देणे ही एक महत्वाची पद्धत आहे. या पद्धतीमध्ये बांबूचा किंवा नायलॉन दोरीचा वापर करून झाडांना आधार देण्यात येतो. ही पद्धत शक्यतो झाडाने घड टाकल्यानंतर करावी. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे झाडांची वारा- वादळाच्या स्थितीमध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि होणारे नुकसान टळते.

6   

नर फुलांची काढणी:
केळीच्या झाडाने घड टाकल्यानंतर योग्य वाटणाऱ्या 8-10 फांद्या ठेवाव्यात आणि योग्य झालेल्या फण्या व घडाच्या टोकाशी असलेले नरफुल (कमळ) काढून टाकावे. जेणेकरून घडांची योग्य वाढ व्हावी.

7  

घडांना अन्नद्रव्ये देणे:
ही पद्धत भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था, बेंगळूरु येथून विकसित झालेली आहे. ही एक सर्वात उत्तम पद्धत असून, या पद्धतीचा फायदा केळीच्या घडाचे वजन 2-4 किलोने वाढण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये नत्र- पालाश आणि गंधक व गायीच्या शेणाची कढी हे घडाच्या ( नरफुल काढणीनंतर) बांधून ठेवावीत. त्यामुळे या अन्नद्रव्यांचे पोषण घड भरणीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. या पद्धतीमध्ये 7.5 ग्रॅम नत्र (युरिया) आणि 7.5 ग्रॅम पालाश हे 100 मी.ली. पाण्यामध्ये मिक्षण तयार करावे. सोबतच  त्या मिक्षनामाध्ये 500 ग्रॅम गाईचे ताजे शेण वापरावे. हे सर्व मिक्षण एका प्लॅॅस्टिक पिशवी मध्ये घ्यावे आणि घडाच्या टोकाला (घडाच्या टोकाला साधारण  10 ते 15 से.मी. जागा असली पाहिजे) सुतळीच्या दोरीच्या साहाय्याने घट्ट बांधावे. ही पद्धत झाडांना फळधारणा झाल्यानंतर 2-5 दिवसांमध्ये करावी. यामुळे घडांचे व प्रत्येक फळाचा आकार वाढून वजनात वाढ होते.

8       

घड झाकणे:
विशेषतः ही पद्धत निर्यात करणारे शेतकरी करतात. घड झाकण्याचा हेतू म्हणजे घडांचे थंडीपासून संरक्षण करणे, तीव्र सूर्यप्रकासहापासून संरक्षण करणे आणि किटकांपासून प्रतिबंध करणे हा होय. या पद्धतीमुळे फळांची गुणवत्ता टिकविण्यास फार मदत होते. या पद्धतीमध्ये साधारणत: निळ्या रंगाची प्लास्टिक पिशवी घड झाकण्यासाठी वापरावी किंवा पारदर्शक सुद्धा वापरू शकता.

9    खोडांची (झाडांची) कापणी करणे:
हि पद्धत केळींचे घड तोडणीनंतर करतात. या पद्धतीचा हेतू असा की, घड काढणीनंतर संपूर्ण झाड किंवा खोड एकदम न तोडता काही कालावधीच्या अंतराने थोडे थोडे झाडाचा भाग कापत जावा. जेणेकरून नवीन आलेल्या पिलला कापलेल्या खोडांपासून भरपूर अन्नद्रव्ये मिळावीत व निरोगी पिल तयार व्हावे ते पिल येणाऱ्या वर्षीचे पिक घेण्यास वापरावे.


श्री. शक्तीकुमार आनंदराव तायडे
पीएच.डी.विद्यार्थी, उद्यानविद्या विभाग 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
7588189834

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters