कमी पावसाच्या प्रदेशात आणि बागायती क्षेत्र कमी असलेल्या प्रदेशात शेवगा पीक उत्तम येते. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बरेचसे क्षेत्र हे कोरडवाहू असून अशा क्षेत्रात शेवगा लागवड फायद्याची ठरते. जर शेवगा पिकाला लागणाऱ्या पाण्याचा विचार केला तर इतर पिकांपेक्षा याला पाण्याची कमी आवश्यकता असते.
शेवगा पिकाला लागणारे हवामानाचा विचार केला तर कोणत्याही हवामानात शेवगा पीक उत्तम येते. परंतु जून व जुलै हा काळ शेवगा पिकासाठी उत्तम मानला जातो. कारण या वेळेत हवेतील आद्रता वाढते तसेच वातावरणातील उष्णता देखील कमी असते. त्यामुळे या काळात शेवगा लागवड केल्यास रोपांची वाढ उत्तम होते. शेवगा लागवडीसाठी आवश्यक असणार्या जमिनीचा विचार केला तर अत्यंत हलक्या किंवा भारी जमिनीतही शेवगा लागवड करता येते. जास्त पावसाच्या प्रदेशात उताराच्या जमिनीवर शेवग्याची लागवड करता येते.
शेवग्याच्या उत्तम जाती
कोईमतूर 1, कोईमतूर 2, पिकेएम 1, पी के एम 2 या जाती कोईमतुर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहेत. या जातीची झाडे पाच ते सहा मीटर उंच वाढतात. तसेच झाडाला 16 ते 22 फांद्या येतात. पी के एम 2 या जातीपासून लागवडीपासून सहा ते सात महिन्यात शेंगा यायला सुरुवात होते. शेंगा पाच ते सहा सेंटीमीटर लांब, दर्द व हिरव्या असल्यामुळे बाजारात देखील चांगली मागणी असते तसेच या खायला स्वादिष्ट व रुचकर असतात.
शेवग्याची लागवड पद्धत
शेवग्याची लागवड करण्याअगोदर पावसाळा सुरू होण्यापूर्वी 60 सेंटिमीटर खोल, लांब व रुंद खोदलेल्या खड्ड्यामध्ये चांगले शेणखत, चांगल्या प्रतीची माती,15:15:15 अडीचशे ग्रॅम,दहा ग्रॅम लिंडेन पावडर टाकून खड्डा भरावा. लागवड करतेवेळी झाडांच्या दोन ओळींमधील अंतर तीन मीटर व दोन झाडांमधील अंतर तीन मीटर ठेवावे.शेवग्याच्या झाडाला व्यवस्थित आकार देणे फार गरजेचे असते.शेवग्याच्या झाडाची वाढ खूप झपाट्याने होत असते.
शेवग्याची छाटणी
शेवगा लागवड केल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी व झाडाची उंची तीन ते चार फूट झाल्यानंतर झाडाच्या वरच्या बाजूने अर्धा ते एक फूट शेंडा छाटावा.
त्यामुळे झाडांची उंची मर्यादित ठेवून शेंगा येणाऱ्या फांद्या तीन ते चार फूट खाली आल्याने शेंगा तोडणी सोपे होते. लागवड केल्यापासून सहा ते सात महिन्यांमध्ये शेवग्याचे उत्पादन सुरू होते.उत्पादन सुरू झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांपर्यंत उत्पादन मिळत राहते. एक पीक घेतल्यानंतर पूर्ण झाडाची छाटणी करून त्याला योग्य तो आकार द्यावा. त्यासाठी झाडाचा मुख्य बुंधा तीन ते चार फूट ठेवून बाजूच्या फांद्या एक ते दोन फूट ठेवाव्यात.
Share your comments