महाराष्ट्र मध्ये फळबाग लागवड क्षेत्रात खूप अशी वाढ होत आहे. बरेच शेतकरी आता फळबाग लागवडीकडे वळत आहेत.
शेतकऱ्यांना फळबाग लागवडीला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनातर्फे देखील अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य केले जाते. त्यासाठी शासनाने फळबाग लागवडीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या निकषांमध्ये बदल केले आहेत. आता नवीन बदलानुसार पिकांना कमाल सात ते आठ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे जर पाच गुंठ्यात फळबाग लागवड केली असेल तरीसुद्धा अनुदान मिळेल अशी देखील माहिती मिळाली आहे.
कमीत कमी वीस गुंठ्यांवर फळबाग लागवड असेल जर अगोदर अनुदान मिळत होते, परंतु आता अशा प्रकारच्या जाचक अटी काढण्यात आले असून आता चक्क पंधरा गुंठ्याची यामध्ये कपात करण्यात आली आहे. म्हणजेच आता पाच गुंठे जमिनीत जरी लागवड केली असेल तरी शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकणार आहे.
त्यातील बरेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करीत आहेत. जर आपण अगोदरचा विचार केला तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सव्वा दोन लाख रुपये अनुदान मिळत होते. परंतु आता यासाठी दोन हेक्टर ची मर्यादा निश्चित करण्यात आली असून या दोन हेक्टरसाठी आठ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. हे अनुदान पेरू, संत्रा, द्राक्ष आणि आंबा इत्यादी फळपिकांना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्वतःच्या शेतावर, शेताच्या बांधावर तसेच पडीक जमिनीवर फळबाग लागवड केल्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाते.
या मधील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कुळाच्या जमिनीवर देखील फळबाग लागवड करता येते. परंतु यासाठी संबंधित कुळाची संमती असणे आवश्यक आहे.
फळबाग लागवडीमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीसाठी काही गोष्टी कारणीभूत आहेत जसे की, सूक्ष्म सिंचन अनुदानाची सुटसुटीत होत असलेली प्रक्रिया त्यासोबत खाजगी व सरकारी रोपवाटिकांमधून रोपांचा होत असलेला वाढता पुरवठा राज्याच्या फळबाग लागवडीला पोषक ठरत आहे.
Share your comments